कर्जाचा हप्ता वाढणार; बँकांकडून व्याजदरात वाढ

वृत्तसंस्था
शनिवार, 3 मार्च 2018

कपातीची शक्‍यता धूसर 
चलनवाढीचा आलेख चढता असल्याने व्याजदर कपातीची शक्‍यता रिझर्व्ह बॅंकेने मागील पतधोरणात फेटाळून लावली होती. सरकारकडून व्याजदर कपातीचा दबाव वाढत असतानाही चलनवाढ वाढत असल्याने व्याजदर कपात शक्‍य नसल्याचे बॅंकेने म्हटले आहे. आगामी काळात चलनवाढ वाढण्याची शक्‍यता असल्याने व्याजदर कपातीची शक्‍यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडियासह आयसीआयसीआय बॅंक आणि पंजाब नॅशनल बॅंक यांनी कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. या बॅंकांच्या पावलांवर पाऊल ठेवून इतर बॅंकांही व्याजदरवाढीचे पाऊल उचलण्याची शक्‍यता असून, यामुळे गृह कर्जासह अन्य कर्जांचा हप्ता आता वाढणार आहे. 

स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बॅंकेकडील रोख रक्कम कमी झाल्याने ठेवींवरील व्याजदरात अर्धा टक्का वाढ केली आहे. याचबरोबर बॅंकेने 1 मार्चपासून कर्जदरात 0.20 टक्के वाढ केली आहे. यामुळे कर्जदर 7.95 वरून 8.15 टक्‍क्‍यांवर आला आहे. याचप्रमाणे आयसीआयसीआय बॅंक आणि पंजाब नॅशनल बॅंकेने 1 मार्चपासून "एमसीएलआर'मध्ये 0.15 टक्के वाढ केली आहे. पंजाब नॅशनल बॅंकेने गृहकर्जासाठी व्याजदर 8.6 टक्के आणि महिला कर्जदारांसाठी तो 8.55 टक्के केला आहे. 

इतर बॅंकाही कर्जदरात वाढ करण्याचे पाऊल आगामी काळात उचलणार आहेत. एचडीएफसी बॅंक पुढील आठवड्यात व्याजदरांचा आढावा घेणार आहे. चलनवाढीतील वाढ लक्षात घेता रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपात होण्याची शक्‍यता कमी झाल्याचे मत नुकतेच मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केले होते. 

कपातीची शक्‍यता धूसर 
चलनवाढीचा आलेख चढता असल्याने व्याजदर कपातीची शक्‍यता रिझर्व्ह बॅंकेने मागील पतधोरणात फेटाळून लावली होती. सरकारकडून व्याजदर कपातीचा दबाव वाढत असतानाही चलनवाढ वाढत असल्याने व्याजदर कपात शक्‍य नसल्याचे बॅंकेने म्हटले आहे. आगामी काळात चलनवाढ वाढण्याची शक्‍यता असल्याने व्याजदर कपातीची शक्‍यता कमी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

Web Title: business news loan rate hike