नवे ‘आयपीओ’ कसे आहेत?

नवे ‘आयपीओ’ कसे आहेत?

हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स 
भारत सरकारच्या नवरत्न कंपन्यांमधील एक हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स कंपनीचा ‘आयपीओ’ खुला झाला असून, २० मार्चपर्यंत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. १२१५- १२४० आहे. कमीत कमी १२ (रु. १४,८८०) व जास्तीत जास्त १५६ (रु. १,९३,४४०) शेअरसाठी छोटे (रिटेल) गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. शिवाय, त्यांच्यासाठी प्रतिशेअर रु. २५ सवलत जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय संरक्षण दलाशी संबंधित असलेली सर्व प्रकारची विमाने, हेलिकॉप्टर, एरोइंजिन्स आदींची रचना, उत्पादन ते विक्रीपश्‍चात सर्व सेवा ही कंपनी पुरविते. ९३ टक्के विक्री ही लष्करालाच केली जाते. ३१ डिसेंबर २०१७ रोजी कंपनीची ऑर्डर बुक रु. ६८,४६१ कोटी इतकी मजबूत आहे. ती अंदाजे कंपनीच्या चार वर्षांच्या विक्रीएवढी आहे. मागील तीन वर्षांमध्ये कंपनीच्या उत्पन्नामध्ये ९ टक्के, तर निव्वळ नफ्यात ६२ टक्के (सीएजीआर) वाढ झाली आहे. पुढील एक वर्षाचा अंदाजे नफा गृहीत धरता आणि रु. १२४० किंमत धरल्यास पीई रेशो १५ च्या आसपास येतो, तर पीबी रेशो ३.४६ येतो.

लष्करी विमाने आणि हेलिकॉप्टर यांच्याशी संबंधित असलेली तांत्रिक कौशल्ये व ज्ञान या बाबतीत कंपनीचे असलेले स्थान अबाधित आणि निर्विवाद आहे. आगामी काळात लष्कराकडून केवढी मोठी मागणी असणार आहे, हे कंपनीच्या ऑर्डर बुकवरूनच दिसत आहे. त्यामुळे उत्तम आर्थिक आकडेवारी आणि आकर्षक दिलेली ऑफर किंमत बघता दीर्घ कालावधीसाठी या इश्‍यूसाठी अर्ज करण्यास हरकत नसावी. 

बंधन बॅंक ः
भारतातील सर्वांत मोठी मायक्रो लेंडर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंधन बॅंकेचा ‘आयपीओ’ खुला झाला असून, १९ मार्चपर्यंतच विक्रीसाठी उपलब्ध आहे. या इश्‍यूसाठीचा किंमतपट्टा प्रतिशेअर रु. ३७०- ३७५ आहे. कमीत कमी ४० व जास्तीत जास्त ५२० शेअरसाठी किरकोळ गुंतवणूकदार अर्ज करू शकतील.

२०१५ पासून बॅंकेचे कामकाज सुरू झाले आहे, त्यामुळे केवळ दोन वर्षांच्या आकडेवारीवरून पुढचे अंदाज बांधणे अवघड आहे. बॅंकेची रिटर्न ऑन नेटवर्थ २५ टक्के आहे. रु. ३७५ किंमत गृहीत धरता पीबी रेशो ४ च्या आसपास येतो. आज बाजारात नोंदणी झालेल्या सर्व बॅंकांपेक्षा हा रेशो जास्त आहे. उज्जीवन फायनान्सचा पीबी रेशो २.१ आहे.

येथून पुढे वाढणाऱ्या व्यापामुळे ही बॅंक किती कुशलतेने काम करेल हे बघणे महत्त्वाचे असेल. तसेच, ‘पीएनबी’तील गैरव्यवहारामुळे सध्या शेअर बाजारातील बॅंकांच्या शेअरमध्ये मंदी आहे. त्यामुळे मोठ्या बॅंकासुद्धा आकर्षक किमतीला उपलब्ध आहेत. उत्तम आर्थिक कामगिरी असूनदेखील बंधन बॅंकेचा ‘आयपीओ’ तुलनेने महाग असल्याने याच्या शेअरची बाजारात नोंदणी वर होईल की नाही, हे सांगणे अवघड आहे. त्यामुळे नोंदणीनंतर योग्य किंमत आल्यास हा शेअर घेणे उचित ठरेल, असे वाटते.

(डिस्क्‍लेमर - लेखिका ‘सेबी’ नोंदणीकृत सल्लागार आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी ‘सकाळ’ सहमत असेलच असे नाही. वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com