नीरव मोदीभोवतीचे फास आवळले 

वृत्तसंस्था
सोमवार, 5 मार्च 2018

आणखी चौघांना अटक 
"पीएनबी' गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी चौघांना अटक केली. फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेडचे तत्कालीन सहायक सरव्यवस्थापक मनीष बोसामिया व तत्कालीन वित्त व्यवस्थापक मितेन अनिल पंड्या यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा "लेटर ऑफ अंडरटेकिंग'चे (एलओयू) अर्ज बनवण्यात सहभाग होता. याशिवाय संपत अँड मेहका कंपनीचे सनदी लेखापाल संजय रामभिया व जिलीचे तत्कालीन संचालक अनियाथ शिव रमण नायर यांना अटक झाली आहे. यात "एलओयू' अर्जावर अधिकृत स्वाक्षरी करण्यात नायर याचा सहभाग होता, अशी माहिती "सीबीआय'ने दिली.

मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय यंत्रणांनी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या भोवतालचे फास आवळण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), सक्त वसुली संचालनालय (ईडी) व प्राप्तिकर विभागासह आता महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मोदीविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. आयात-निर्यातीच्या नियमांचे 2014-15 मध्ये उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई होणार आहे. 

"सेंट्रल बोर्ड ऑफ एक्‍साईज अँड कस्टम'च्या (सीबीईसी) नियमावलीनुसार करचुकवेगिरी करणाऱ्या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाईची तरतूद आहे. त्यानुसार "डीआरआय'च्या महासंचालकांनी नीरव मोदी व त्याच्या तीन कंपन्यांविरोधात कारवाईला संमती दिली. आयात केलेले हिरे व रत्नांची किंमत, त्यांचा दर्जा याची चुकीची माहिती जाहीर केल्यास सीमाशुल्क कायद्यानुसार अशा वस्तू जप्त होऊ शकतात. 

"डीआरआय'ने दिलेल्या माहितीनुसार कर चुकवलेल्या वस्तू स्थानिक विक्रीसाठी वापरणे, बनावट कागदपत्रे सादर करणे, सीमा शुल्क चुकवून सरकारचे नुकसान करणे, विशेष आर्थिक क्षेत्रातील अधिकृत कार्याचा भंग करणे आदी विविध बाबींमध्ये मोदी व त्यांच्या कंपन्यांचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी आढळले आहे. त्यानुसार नीरव मोदीसह त्याच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल, राधाशीर ज्वेलरी कंपनी लिमिटेड आदी कंपन्यांवर कारवाई सुरू केली आहे. 2014-15 मध्ये हे प्रकरण घडले असून, त्याबाबत मोदीला त्या वेळी कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. 

आणखी चौघांना अटक 
"पीएनबी' गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी चौघांना अटक केली. फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेडचे तत्कालीन सहायक सरव्यवस्थापक मनीष बोसामिया व तत्कालीन वित्त व्यवस्थापक मितेन अनिल पंड्या यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा "लेटर ऑफ अंडरटेकिंग'चे (एलओयू) अर्ज बनवण्यात सहभाग होता. याशिवाय संपत अँड मेहका कंपनीचे सनदी लेखापाल संजय रामभिया व जिलीचे तत्कालीन संचालक अनियाथ शिव रमण नायर यांना अटक झाली आहे. यात "एलओयू' अर्जावर अधिकृत स्वाक्षरी करण्यात नायर याचा सहभाग होता, अशी माहिती "सीबीआय'ने दिली.

Web Title: business news Nirav Modi PNB scam