'या' कर्जधारकांना 'पासपोर्ट'ची माहिती देणे बंधनकारक

वृत्तसंस्था
शनिवार, 10 मार्च 2018

निरव मोदी प्रकरणानंतर बँकिंग प्रणाली 'अलर्ट' मोडवर आली आहे. मोठे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याचा फटका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसतो आहे. परिणामी आता सरकारकडून आर्थिक गुन्हयांना आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

मुंबई : आता पन्नास कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज घेणाऱ्यांना यापुढे बँकांना 'पासपोर्ट'ची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून मोठे कर्ज घेताना आता 'पासपोर्ट'ची माहिती बंधनकारक आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, ज्या कर्जदारांनी पन्नास कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज घेतले आहेत त्यांना येत्या ४५ दिवसांच्या 'पासपोर्ट'ची संपूर्ण माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. 

निरव मोदी प्रकरणानंतर बँकिंग प्रणाली 'अलर्ट' मोडवर आली आहे. मोठे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जाण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याचा फटका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसतो आहे. परिणामी आता सरकारकडून आर्थिक गुन्हयांना आळा घालण्यासाठी पावले उचलली जात आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने अलीकडेच एका विधेयकास मंजुरी दिली आहे. विधेयकानुसार,  देशात आर्थिक गुन्हे करून परदेशात फरारी झालेल्या आर्थिक गुन्हेगारांच्या मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग सोपा करण्यात आला आहे. 

हजारो कोटींचे कर्ज बुडवून फरार असलेला विजय मल्ल्याने या आधीच देश सोडला आहे. आता पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) १२,७०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेला निरव मोदी आणि मेहुल चोक्सी देखील परदेशात पळून गेले आहेत. त्यामुळे त्यांना परत भारतात आणून कायदेशीर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आधीच खबरदारी घेत आता मोठे कर्ज घेणाऱ्या कर्जदारांना 'पासपोर्ट'ची संपूर्ण माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Web Title: business news Passport Details Must for Loans of Rs 50 Crore and Above says Government