आरबीआयने दोन हजारांच्या नोटांची थांबवली छपाई

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

रिझर्व्ह बॅंक एकतर नोटांची छपाई थांबवू शकते, किंवा दोन हजारांच्या नोटा परत मागवू शकते. जर रिझर्व्ह बॅंकेने २,४६३ अब्ज रुपयांच्या मोठ्या मूल्यांच्या म्हणजेच दोन हजारांच्या नोटा छापल्या असतील, मात्र त्या व्यवहारात आणल्या नाहीत, असे म्हणता येऊ शकेल.  
सौम्या कांती घोष, मुख्य आर्थिक सल्लागार, एसबीआय.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बॅंकेने दोन हजारांच्या नोटा चलनात आणल्या नसाव्यात अथवा या नोटांची छपाई थांबवण्यात आली असावी, अशी शक्‍यता स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. कमी मूल्याच्या ३,५०१ दशलक्ष रुपयांच्या नोटा मार्च २०१७ पासून व्यवहारात वापरण्यात आल्या असल्याची माहितीही या अहवालात व्यक्त करण्यात आलेली आहे.

एसबीआय इकोफ्लॅश अहवालात मोठ्या मूल्याचे चलन १३,३२४ अब्ज रुपये आहे. रिझर्व्ह बॅंकेने आतापर्यंत पाचशे रुपयांच्या १६,९५७ दशलक्ष नोटा छापल्या असून कमी मूल्यांच्या ३,५०१ दशलक्ष नोटा छापल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या मूल्याच्या १५,७८७ अब्ज रुपयांच्या नोटांची छपाई केलेली आहे. कमी मूल्याच्या नोटा एकुण चलनाच्या ३५ टक्के असून जास्त मूल्याच्या नोटांचे प्रमाण हे ६५ टक्के आहे. दोन हजारांच्या नोटा या सामान्य व्यवहारांसाठी आव्हान ठरत आहेत. मोठ्या मूल्याच्या नोटांऐवजी पन्नास आणि दोनशे रुपयांच्या छोट्या चलनी नोटा रिझर्व्ह बॅंकेकडून जारी होण्याची शक्‍यता आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करत जुन्या पाचशे व एक हजार रुपयांच्या वापरावर बंदी आणली होती. 

रिझर्व्ह बॅंक एकतर नोटांची छपाई थांबवू शकते, किंवा दोन हजारांच्या नोटा परत मागवू शकते. जर रिझर्व्ह बॅंकेने २,४६३ अब्ज रुपयांच्या मोठ्या मूल्यांच्या म्हणजेच दोन हजारांच्या नोटा छापल्या असतील, मात्र त्या व्यवहारात आणल्या नाहीत, असे म्हणता येऊ शकेल.  
सौम्या कांती घोष, मुख्य आर्थिक सल्लागार, एसबीआय.

Web Title: business news RBI may be holding back printed ₹2,000 notes SBI report