शेअर बाजाराकडे का वळायला हवे?

सुहास राजदेरकर 
सोमवार, 15 जानेवारी 2018

गेल्या म्हणजे २०१७ या एका वर्षात तीन शेअरनी १००० टक्‍क्‍यांच्या वर परतावा, १२० शेअरनी २०० ते ९०० टक्के परतावा आणि ३४७ शेअरनी १०० टक्के आणि त्याहून अधिक परतावा दिला आहे. शेअर बाजाराविषयी भीती न बाळगता त्याकडे सकारात्मक नजरेने पाहिले आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दीर्घ काळासाठी गुंतवणूक केली तर जोखीम कमी करून चांगला परतावा मिळविता येतो. २०१७ या वर्षाने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे.

जगामधील सर्व शेअर बाजारांसाठी २०१७ हे वर्ष चांगलेच राहिले. भारतातील शेअर बाजारांनीसुद्धा एका वर्षात साधारण २८ टक्के; तर मिडकॅप शेअरनी ४८ टक्के इतका घसघशीत परतावा दिला आहे. कायदेशीर मार्गाने तुमचे एक लाख रुपये एका वर्षात तब्बल १७ लाख रुपये करण्याची किमया शेअर बाजाराच करू शकतो आणि तेसुद्धा करमुक्त! सोबतच्या तक्‍त्यामध्ये (अनेक उदाहरणांपैकी) पहिल्या १० कंपन्यांची उदाहरणे दिली आहेत. प्राथमिक (आयपीओ) बाजाराचा विचार केला, तर डी-मार्ट या शेअरने २९९ रुपये मूळ किमतीवरून नऊ महिन्यांत १२०० रुपयांपर्यंत झेप घेतली. मागील १५ वर्षांमध्ये बऱ्याच शेअरनी अतिशय चांगला परतावा दिला आहे. मारुती सुझुकीचा शेअर २००३ मध्ये १५५ रुपयांवर बाजारात नोंदला गेला होता, तो आज १४ वर्षांत १०,००० रुपयांवर पोचला आहे. २००२ मध्ये ६५ हजार रुपयांची रॉयल एन्फिल्ड बाईक न घेता जर त्या कंपनीचे म्हणजेच आयशर मोटर्सचे शेअर घेतले असते, तर आज त्याचे चार कोटी रुपये झाले असते. टायटन, इन्फोसिस, विप्रो, क्रिसिल, एमआरएफ, सिम्फनी अशी अनेक उदाहरणे आहेत आणि या कंपन्यांनी दिलेल्या लाभांशाचा विचार येथे केलेला नाही. जो जर केला तर हा परतावा आणखी वर जाईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हा सर्व परतावा एका वर्षानंतर करमुक्त अर्थात ‘टॅक्‍स फ्री’ आहे! 

असे असूनसुद्धा आज भारतात १३० कोटी लोकसंख्येपैकी फक्त ३ कोटी लोक शेअर बाजारामध्ये सक्रिय आहेत, ज्यांची ट्रेडिंग कम डीमॅट खाती आहेत. एक एप्रिल रोजी नव्या आर्थिक वर्षाचे संकल्प करताना एक तरी ट्रेडिंग कम डीमॅट खाते उघडा, असे आवाहन मी सलग गेली चार वर्षे करीत आलो आहे, की ज्याद्वारे तुम्हाला चांगल्या ‘आयपीओ’मध्ये तरी गुंतवणूक करता येईल. शेअर बाजार खाली गेला तरी गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नसते. याविषयी अधिक नंतर बोलूया.

Web Title: business news share market