'हलाहल पचवण्याची तयारी'

पीटीआय
गुरुवार, 15 मार्च 2018

बॅंकिंग व्यवस्थेतील प्रत्येक घडामोडीवर नियामक लक्ष ठेवेल, असे म्हणणे अव्यवहार्य आहे. याचबरोबर बॅंकिंग नियामक संस्थेला आणखी अधिकार देण्याची आवश्‍यकता आहे. 
- ऊर्जित पटेल, गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक

गांधीनगर - बॅंकिंग व्यवस्थेच्या स्वच्छतेसाठी रिझर्व्ह बॅंक ‘नीळकंठा’ प्रमाणे हलाहल पचविण्यास तयार असून, प्रत्येक खडतर परीक्षेतून बॅंकिंग व्यवस्था आणखी सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत, अशी भूमिका रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी बुधवारी मांडली. पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहारानंतर आज प्रथमच पटेल यांनी मौन सोडले. 

‘गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ मधील व्याख्यानात पटेल बोलत होते. ते म्हणाले, की नजीकच्या काळातील बॅंक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाही संताप झाली आहे. काही व्यावसायिक देशाचे भवितव्य लुटून नेण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही बॅंकांशी हातमिळवणी करून असे प्रकार सुरू आहेत. 

पौराणिक कथेचा दाखला देत पटेल म्हणाले, की आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेचे समुद्रमंथन करून रिझर्व्ह बॅंक देशातील कर्ज संस्कृतीची स्वच्छता करीत आहे. हे मंथन पूर्ण होऊन देशाच्या सुरक्षित भवितव्याचे अमृत हाती येईपर्यंत कोणाला तरी हलाहल पचवावे लागेल. ‘नीळकंठा’प्रमाणे हलाहल पचविण्याची रिझर्व्ह बॅंकेची तयारी आहे.

Web Title: business news Urjit Patel Governor Reserve Bank