'सीसीडी'ची कॉफी झाली कडू...

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण, गुंतवणूकदारांनी गमावले 2,437 कोटी !

मुंबई: 'कॅफे कॉफी डे'चे सर्वेसर्वा व्ही जी सिद्धार्थ यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सलग आठ सत्रांमध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीमुळे कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरमध्ये 60 टक्क्यांची घसरण झाली आहे. कंपनीचा शेअर जवळपास 221 रुपये प्रति शेअर या पातळीवरून 76.85 रुपये प्रति शेअर या पातळीवर आला आहे. 29 जुलैच्या संध्याकाळी सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण व्हायला सुरूवात झाली होती. शेअरच्या किंमतीत झालेल्या 60 टक्क्यांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी 2,437.29 कोटी रुपये गमावले आहेत. त्यामुळे 29 जुलैला कॉफी डे एंटरप्राईझेसचे बाजारमूल्य 4,067.65 कोटी रुपये होते ते घसरून 1,630.86 कोटी रुपयांवर आले आहे. मागील काही दिवसांपासून कंपनीच्या शेअरला सातत्याने लोअर सर्किट लागते आहे. आयसीआरएने कंपनीच्या पतमानांकनातही घट केली आहे. 

कॅफे कॉफी डेचे संस्थापक व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह नेत्रावती नदीत सापडला होता. मंगळूरू येथील होईग बाजाराजवळ नदीकाठावर सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला होता. कंपनीच्या आर्थिक संकटामुळे निराश झाल्याचे सिद्धार्थ यांचे पत्र प्रसिद्धी माध्यमांसमोर आले होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या कॉफी चेनची (कॅफे कॉफी डे) स्थापना केली होती. 
देणेदार, कंपनीवरील कर्ज आणि खासगी इक्विटी भागीदार यांच्या आपण प्रचंड दबावाखाली असल्याचे सिद्धार्थ यांनी आपल्या पत्रात म्हटले होते. प्राप्तिकर विभागाकडूनही प्रंचड मनस्तापाला सामोरे जावे लागल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र कंपनीच्या आर्थिक संकटाची तसेच गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची जबाबदारी त्यांनी स्वत:वरच घेतली होती. त्यांच्या मृत्यूचा त्यांचे कुटुंबिय, मित्र परिवार, गुंतवणूकदार आणि उद्योगजगताला मोठा धक्का बसला आहे. त्यांना शोधण्यासाठी नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, कोस्ट गार्ड, होम गार्ड, अग्निशमन दल आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.

कॅफे कॉफी डेची मुख्य प्रवर्तक कंपनी असलेल्या कॉफी डे एंटरप्राईझेस लि.चा शेअर आज राष्ट्रीय शेअर बाजारात 76.85 रुपये प्रति शेअर या पातळीवर व्यवहार करतो आहे. 

व्ही जी सिद्धार्थ यांचे वडील कॉफीच्या मळ्याचे मालक होते. सिद्धार्थ यांनी स्टारबक्ससारख्या प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ब्रॅंडला भारतीय प्रतिस्पर्धी उभा केला होता. त्यांच्या कुटुंबाला 140 वर्षांचा कॉफी लागवडीचा इतिहास आहे. कॉफीच्या व्यवसायात उतरण्याआधी त्यांनी शेअर बाजारात ट्रेडिंगसुद्धा केली होती. जर्मन कॉफी चेन चिबोच्या मालकांकडून प्रेरणा घेऊन त्यांनी कॅफे कॉफी डे या कंपनीची स्थापना केली होती. 1994 मध्ये त्यांनी बंगळूरू येथे पहिले कॉफी शॉप सुरू केले होते.

ऑक्टोबर 2015 मध्ये कॅफे कॉफी डेचा आयपीओ बाजारात आला होता. त्यावेळेस त्या शेअरचा किंमतपट्टा 316 - 328 रुपये प्रति शेअर होता. या आयपीओला 4 स्टार रेटिंग मिळाले होते. हा आयपीओ 1.81 पट ओव्हरसबस्क्राईब झाला होता. कंपनीने यातून 1,150 कोटी रुपयांचे भांडवल उभारले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cafe Coffee Day shares slump to hit all-time low