esakal | सेबीच्या सूचनेनंतर कंपन्यांनी दिली आर्थिक फटक्याची माहिती; महसूलात मोठी घट
sakal

बोलून बातमी शोधा

सेबीच्या सूचनेनंतर कंपन्यांनी दिली आर्थिक फटक्याची माहिती; महसूलात मोठी घट

पुढील काही दिवसात आणखी कंपन्या आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती देण्याची शक्यता आहे. २५ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू आहे.३१ मे ही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अंतिम मुदत आहे.

सेबीच्या सूचनेनंतर कंपन्यांनी दिली आर्थिक फटक्याची माहिती; महसूलात मोठी घट

sakal_logo
By
वृत्तसंस्था

डी-मार्टच्या महसूलात एप्रिलमध्ये ४५ टक्क्यांची घट

कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनचा उद्योग जगतावर विपरित परिणाम झाला आहे. कंपन्यांच्या कामकाजाबरोबरच बाजारातील वस्तूंच्या मागणीला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. या कालावधीत कंपन्यांवर झालेल्या आर्थिक परिणामाची माहिती जाहीर करण्याची सूचना सेबीने कंपन्यांना केली होती. दहापेक्षा जास्त कंपन्यांनी सध्या लॉकडाऊनमुळे बसलेल्या फटक्याची माहिती दिली आहे. याआधी असंख्य नोंदणीकृत कंपन्यांनी लॉकडाऊनमुळे कामकाज ठप्प झाल्याची माहिती दिली होती, मात्र या कंपन्यांनी लॉकडाऊनमुळे झालेल्या आर्थिक तोट्याची माहिती दिली नव्हती. सेबीने केलेल्या पाठपुराव्यामुळे आता डी-मार्ट, टायटन, लीला हॉटेल्स यासारख्या काही कंपन्यांनी लॉकडाऊनमुळे त्यांना बसलेल्या आर्थिक फटक्याची माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लीला हॉटेल्सला जून महिन्यात शून्य महसूल मिळणे अपेक्षित आहे. तर एप्रिल महिन्यात महसूलात ४५ टक्क्यांची घट झाल्याची माहिती डी-मार्टने दिली आहे. एप्रिल महिना हा नव्या आर्थिक वर्षाची सुरूवात असते. त्यामुळे आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता कंपनीने वर्तवली आहे. विक्रीतील घट, मार्जिनमधील घट, लॉकडाऊनच्या कालावधीत वाढलेला उत्पादन खर्च, कर्मचाऱ्यांच्या आणि स्टोअरच्या वैद्यकीय सुरक्षतितेसंदर्भात करावा लागणारा खर्च यामुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी घट अपेक्षित असल्याचे मत डी-मार्टने व्यक्त केले आहे.  

हेही वाचा : कोरोनाच्या संकटात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना 'या' टिप्स घ्या लक्षात​

पुढील काही दिवसात आणखी कंपन्या आपल्या आर्थिक परिस्थितीची माहिती देण्याची शक्यता आहे. २५ मार्चपासून देशभर लॉकडाऊन सुरू आहे. ३१ मे ही लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्याची अंतिम मुदत आहे.

टाटा समूहाकडून वेतन कपात; सीईओ आणि एमडींच्या वेतनात 20 टक्क्यांची कपात

* लॉकडाऊनमुळे कंपन्यांवर झालेल्या आर्थिक परिणामाची माहिती जाहीर करण्याची सेबीची सूचना
* डी-मार्टच्या महसूलात ४५ टक्क्यांची घट 
*  आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता
* भविष्यातील परिणामांची शक्यतेची माहिती आपल्या गुंतवणूकदारांना द्यावी, सेबीची कंपन्यांना सूचना

याआधी सेबीने कोरोना महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनचा कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या परिणामाची माहिती, गुंतवणूकदार आणि भागीदारांना देण्याची सूचना केली होती. शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कंपन्यांनी कोरोना महामारीचा त्यांचा व्यवसाय, कामगिरी आणि आर्थिक स्थितीवर झालेल्या गुणात्मक आणि संख्यात्मक परिणामाची माहिती, भविष्यातील परिणामांची शक्यता याची माहिती आपल्या गुंतवणूकदारांना द्यावी असे सेबीने आपल्या सूचनापत्रकात म्हटले होते.

याशिवाय सेबीने मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजारा यांना सर्व नोंदणीकृत कंपन्यांपर्यत हे सूचनापत्रक पोचवण्याची आणि त्यांच्या वेबसाईटवर हे पत्रक प्रसिद्ध करण्याचीही सूचना दिली होती.

कच्च्या तेलाच्या किंमतीत १३ टक्क्यांनी वाढ

कोरोना महामारीचा व्यवसायावर झालेला परिणाम, कंपनीचे कार्यालय, उत्पादन प्रकल्प सुरू असल्यास किती क्षमतेने सुरू आहेत, बंद असल्यास त्याची माहिती, जर नजीकच्या काळात कामकाज सुरू करणार असल्यास त्यांसंबधीचे पुढील वेळापत्रक, भविष्यात कोरोना महामारीचा कंपनीच्या कामकाजावर होणाऱ्या परिणामाची शक्यता, या प्रकारच्या माहितीची यादी कंपन्यांनी जाहीर करण्याची सूचना सेबीने केली होती.

loading image
go to top