सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ

बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

मंदी, रोकडटंचाई आणि उच्चांकी दराचा फटका दसऱ्याच्या मुहूर्ताच्या सोने खरेदीला बसला आहे. मंगळवारी (ता. ८) मुंबईतील सराफा बाजारात सोने प्रतिदहा ग्रॅमला ३९ हजार ५०० रुपयांच्या आसपास असल्याने ग्राहकांनी खरेदीचा बेत पुढे ढकलला.

मुंबई -   मंदी, रोकडटंचाई आणि उच्चांकी दराचा फटका दसऱ्याच्या मुहूर्ताच्या सोने खरेदीला बसला आहे. मंगळवारी (ता. ८) मुंबईतील सराफा बाजारात सोने प्रतिदहा ग्रॅमला ३९ हजार ५०० रुपयांच्या आसपास असल्याने ग्राहकांनी खरेदीचा बेत पुढे ढकलला. ग्राहकांच्या अल्प प्रतिसादामुळे यंदा विक्रीत ५० टक्‍क्‍यांहून अधिक घसरण होण्याची भीती इंडियन बुलियन्स ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे. 

महिनाभरात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसून आले आहे. नुकताच सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅमला ३९ हजार ८०० च्या पुढे गेला होता. सोन्याच्या उच्चांकी दराने सराफा बाजारातील वातावरण नकारात्मक केले आहे. 

त्याचबरोबर सोन्यावरील शुल्क, पॅनकार्ड सक्ती, नोटाबंदीनंतरची नियमावली आणि रोकडटंचाई आदी कारणांचा एकत्रित परिणाम दसऱ्याच्या विक्रीवर झाल्याचे सराफा व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनचे 

अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांनी सांगितले. मुंबईत दसऱ्याला तीन टन सोन्याची विक्री होते; मात्र यंदा जेमतेम एक टन सोने विक्री होईल, असा अंदाज कोठारी यांनी व्यक्त केला.

वर्षभरात सोन्याच्या दरात २५ टक्के वाढ
दसऱ्याच्या मुहुर्तावर मागणी वाढण्याच्या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या दरात मंगळवारी प्रतिदहा ग्रॅमला ५०० रुपयांची वाढ झाली. सोन्याचा भाव ३९ हजार ३०० ते ३९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होता. बाजारात चांदी प्रतिकिलो ४६ हजार ५०० रुपये होती. यंदा सोने ३० ते ३१ हजारांच्या दरम्यान होते. वर्षभरात ४० हजारांनजीक पोहोचल्याने सोन्याच्या किमतीत २५ टक्के वाढ झाली आहे. परिणामी ग्राहक ४० हजार रुपयांना सोने खरेदी करण्याच्या मनस्थितीत नाही, असे कदम यांनी सांगितले.