सायरस मिस्त्रींना 'टाटा'; रतन टाटांकडे जबाबदारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

सायरस मिस्त्री यांची पार्श्वभूमी :

सायरस मिस्त्री यांनी लंडनमधील इम्पेरियल महाविद्यालयातून बीई सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केले आहे. लंडन बिझनेस स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सायरस मिस्त्री हे अद्यापपर्यंत शापूरजी पानलजी अँड कंपनी, फोर्ब्ज गोकाक, ऍफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड युनायटेड मोटर्स (भारत) या कंपन्यांचेही अध्यक्ष होते.

मुंबई : नाट्यपूर्ण घडामोडींनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना आज हटविण्यात आले. रतन टाटा यांच्याकडे आता पुन्हा अध्यक्षपदाची तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. नव्या अध्यक्षांची निवड येत्या चार महिन्यांत करण्यात येणार आहे. 
 

टाटा सन्सच्या संचालक मंडळाची आज येथे बैठक झाली. त्या बैठकीत मिस्त्री यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. नवा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात स्वतः रतन टाटा, टीव्हीएस समूहाचे प्रमुख वेणू श्रीनिवासन, बसिन कॅपिटलचे अमित चंद्रा, माजी राजनैतिक अधिकारी रोनेन सेन आणि लॉर्ड कुमार भट्टाचार्य यांचा समावेश आहे. भट्टाचार्य वगळता उर्वरित सर्व जण टाटा सन्सच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. 
 

मिस्त्री यांना हटविण्याची कारणे टाटा सन्सने दिलेली नाहीत. मात्र, तोट्यातील उद्योग बंद करण्याच्या व केवळ फायद्यातील उद्योगांकडे लक्ष देण्याच्या त्यांच्या धोरणामुळे समूहामध्ये नाराजी होती, असे बोलले जाते. यात प्रामुख्याने युरोपातील पोलाद उद्योग गुंडाळण्याच्या हालचाली कारणीभूत झाल्याचे समजते. 
 

रतन टाटा हे 28 डिसेंबर 2012 रोजी टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाले होते. त्यांच्या जागी संचालक मंडळाने मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. टाटा सन्सच्या संचालक मंडळामध्ये 2006 मध्ये मिस्त्री यांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2011मध्ये त्यांना उपाध्यक्ष करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्याकडे टाटांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. शापूरजी पालोनजी या कंपनीच्या शिफारशीवरूनच त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली होती. टाटा सन्सचे सर्वाधिक समभाग याच कंपनीकडे आहेत. 
 

काही दिवसांपूर्वीच सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांशी वेबसाइटच्या माध्यमातून संवाद साधला होता. समूहाच्या खडतर काळात चपळता आणि धिटाई अंगी बाणवणे आवश्‍यक असल्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले होते. सहा खंडांतील 100 देशांमध्ये "टाटा'ने आपला कारभार पसरविला आहे. 

हकालपट्टी बेकायदा 
सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी बेकायदा असल्याचा दावा शापूरजी पालोनजी समूहातर्फे करण्यात आला आहे. शापूरजी पालोनजी हे टाटा समूहाचे सर्वांत मोठे समभागधारक आहेत. विशेष म्हणजे पालोनजी यांनीच सायरस मिस्त्री यांना "टाटा सन्स'चे अध्यक्षपद देण्यात यावे, अशी शिफारस केली होती.

टाटा समूहाची धुरा सांभाळल्यानंतर सायरस मिस्त्री यांच्याकडून जेवढ्या प्रमाणात अपेक्षा होत्या, तेवढ्या त्या पूर्णत्वास जात नसल्याची चर्चा होती. आश्वासनांची पूर्तता करण्यात त्यांना फारसे यश मिळत नसल्याचे म्हटले जात होते. विशेषतः युरोपमधील स्टीलचा व्यवसाय योग्यरीत्या हाताळता न आल्याचा अप्रत्यक्ष ठपका त्यांच्यावर ठेवला जातो. युरोपातील टाटा स्टील प्रकल्प विकण्याचा निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला. शिवाय नफ्यात न चालणाऱ्या कंपन्यांकडे दुर्लक्ष आणि फक्त दुभत्या कंपन्यांकडेच लक्ष देण्याची भूमिका टाटा सन्सला रुचली नसल्याचे बोलले जाते. त्यातच टाटा आणि जपानी "डोकोमो' यांची लाभाची गणितेदेखील जुळली नाहीत. भारतात गाजलेल्या टू-जी दूरसंचार गैरव्यवहारामुळे कंपनीला विस्तार करण्यावर निर्बंध आले आणि परिणामी कंपनीला थ्रीजी सेवेचा विस्तार करता आला नाही. यामुळे "डोकोमो'ने टाटाकडे 1.2 अब्ज डॉलरची मागणी केली आहे. मिस्त्री यांच्याविषयी नाराजी वाढण्यास अशाही घटना कारणीभूत ठरत गेल्या असाव्यात, अशा प्रतिक्रिया जाणकांरांकडून व्यक्त केल्या जात आहेत. टाटासमूहातील टीसीएस, टाटा मोटर्स वगळता टाटा केमिकल्स, टाटा पॉवर अशा सर्वच कंपन्यांमध्ये मंदीसदृश वातावरण आहे.

Web Title: Cyrus Mistry steps down as Tata Sons Chairman