मुहूर्ताला 'सेन्सेक्‍स'ची निराशा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017

मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये आतापर्यंतची "सेन्सेक्‍स'ची ही सर्वांत निराशाजनक कामगिरी आहे. चिनी अर्थव्यवस्थेची वाढ खुंटल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले. जगभरातील प्रमुख शेअर बाजार घसरणीसह बंद झाले.

मुंबई ; जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि सलग सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर नफेखोरांनी केलेल्या नफावसुलीमुळे गुरुवारी मुहुर्तालाच "सेन्सेक्‍स'ने निराशाजनक सुरवात केली. शेअर बाजारात सायंकाळी झालेल्या एक तासाच्या विशेष सत्रात सेन्सेक्‍स 194.39 अंशांच्या घसरणीसह 32,389.96 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या "निफ्टी'त 64.30 अंशांची घसरण झाली आणि तो 10,146.55 अंशांवर बंद झाला.

मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये आतापर्यंतची "सेन्सेक्‍स'ची ही सर्वांत निराशाजनक कामगिरी आहे. 
चिनी अर्थव्यवस्थेची वाढ खुंटल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले. जगभरातील प्रमुख शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. भारतीय बाजारांमध्ये बॅंका, वित्तसंस्था, फार्मा, रिऍल्टी, ऑटो आदी क्षेत्रात गुंतवणूकदारांनी विक्री केली. इंडियन बॅंक, आयसीआयसीआय बॅंक, फेडरल बॅंक, सिंडिकेट बॅंक, कोटक महिंद्रा, डीसीबी बॅंक, अलाहाबाद बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यात घसरण झाली. टाटा टेलिसर्व्हिसेस, आयडिया, रेलिगेअर, फिनोलेक्‍स, सिंटेक्‍स, दिलीप बिल्डकॉन, भारती एअरटेल, बॉम्बे डाइंग, अदानी एंटरप्राइज आदी शेअरमध्ये वाढ झाली. 

दरम्यान, 2074 संवत्सराची नकारात्मक सुरवात झाली असली तरी निर्देशांक पुन्हा तेजीचा मार्ग पकडेल, असा विश्‍वास शेअर दलालांनी व्यक्त केला आहे.

Web Title: D-Street Diwali: Mahurat Trading kick-starts at BSE with market in red