दिवस इंडेक्‍स फंडांचे!

दिवस इंडेक्‍स फंडांचे!

शेअर बाजारातील अलीकडच्या चढ-उतारांमध्येही काही लार्ज कॅप व इंडेक्‍स फंडांची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्षवेधक आहे. इंडेक्‍स फंडांचे खर्च अत्यल्प असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातात जास्त परतावा मिळू शकतो. आपल्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी निदान २० ते २५ टक्के रक्कम इंडेक्‍स फंडात गुंतवायला हवी.

गेले काही दिवस शेअर बाजारात मोठे चढ-उतार होत आहेत. काही दिवसांपूर्वी कधी ५००, तर कधी ७०० अंशांनी कोसळणारा हा बाजार सरकारकडून कंपनीकरात कपात करण्याची घोषणा झाल्यावर एकदम उसळला. दोन दिवसांच्या तेजीनंतर पुन्हा घसरला. शेअर बाजारातील या चढ-उतारांमुळे काही महिन्यांपूर्वी ३० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक परतावा दिलेल्या स्मॉल व मिडकॅप फंडांचा परतावा उणे १० ते २० टक्के इतका कमी झाला आहे. पण या पडझडीतसुद्धा काही लार्ज कॅप व इंडेक्‍स फंडांची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्ष वेधणारी आहे.

सोबतच्या तक्‍त्यावरून लक्षात येईल, की थोडे लार्ज कॅप फंड वगळता इंडेक्‍स फंडांची कामगिरी अधिक चांगली आहे आणि खर्च पण अत्यल्प आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातात जास्त परतावा मिळू शकतो. ही आताची परिस्थिती आहे व बाजाराप्रमाणे लार्ज व मल्टी कॅप फंड जास्त अधिक परतावा देऊ शकतात.

इंडेक्‍स फंड काय असतात?
इंडेक्‍स फंड हे पॅसिव्ह (निष्क्रिय) या प्रकारात मोडतात व त्यांचे खर्चाचे प्रमाण कमी असते. हे फंड ज्या इंडेक्‍सवर आधारीत असतात (उदाहरणार्थ, ‘निफ्टी ५०’) त्या इंडेक्‍समधील सर्व शेअरमध्ये त्यातील शेअरच्या वजनाप्रमाणे गुंतवणूक करतात. थोडक्‍यात, ते इंडेक्‍सचे प्रतिबिंब असतात. भारतात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) व मुंबई शेअर बाजार (बीएसई) हे दोन प्रमुख बाजार आहेत. या दोन बाजारांची कामगिरी दर्शविण्यासाठी निर्देशांकांची रचना करण्यात आली आहे. ‘एनएसई’साठी ‘निफ्टी ५०’ या इंडेक्‍सची रचना केली, तर ‘बीएसई’साठी ‘सेन्सेक्‍स’ निर्देशांक तयार केला गेला. या शिवाय इतरही इंडेक्‍स निर्माण केले गेले आहेत.

‘निफ्टी ५०’ इंडेक्‍समध्ये ५० शेअर आहेत, तर ‘सेन्सेक्‍स’मध्ये ३० शेअर आहेत. इंडेक्‍स फंडाच्या मॅनेजरचे मुख्य काम म्हणजे इंडेक्‍समधील प्रमाणात सर्व शेअर विकत घ्यायचे म्हणजेच त्या इंडेक्‍सची निष्क्रीयपणे कॉपी करायची. त्यामुळे ॲक्‍टिव्ह फंडाचा खर्ज जर १.७ ते २.५ टक्के असेल, तर इंडेक्‍स फंडाचा खर्च केवळ ०.३० ते ०.५० टक्के असतो. त्यामुळे दीर्घकाळात दरवर्षी साधारणपणे १.५ टक्‍क्‍यांची बचत झाली तर इंडेक्‍स फंडात जास्त परतावा मिळू शकतो. म्हणूनच येथे असे सुचवायचे आहे, की आपल्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी निदान २० ते २५ टक्के रक्कम इंडेक्‍स फंडात गुंतवायला हवी व बाकीची ७५ ते ८० टक्के चांगल्या कामगिरीची अपेक्षा असलेल्या लार्ज व मिडकॅप अशा ॲक्‍टिव्ह फंडात ठेवावी.

दोन पर्याय उपलब्ध
इंडेक्‍स फंडामध्ये दोन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे ओपन एंडेड इंडेक्‍स फंड, ज्याची खरेदी व विक्री म्युच्युअल फंड करतात. दुसरा प्रकार म्हणजे एक्‍सचेंज ट्रेडेड फंड, ज्याची नोंदणी स्टॉक एक्‍स्चेंजवर असते आणि खरेदी-विक्री डिमॅट स्वरुपात ब्रोकरमार्फत होते. अनेक फंडांचे ‘निफ्टी ५०’, ‘नेक्‍स्ट ५०’, ‘सेन्सेक्‍स’ अशा वेगवेगळ्या इंडेक्‍सवर आधारित इंडेक्‍स व ईटीएफ आहेत. फंड निवडताना ज्या फंडाचा खर्च कमी व ‘ट्रॅकिंग एरर’ कमी तो फंड निवडावा. ‘ट्रॅकिंग एरर’ म्हणजे शेअर निर्देशांक व फंड यांच्या कामगिरीतील तफावत!

बाजारातील सध्याची अस्थिरता व मंदीचे वातावरण काही काळानंतर जाईल. बाजाराला परत चांगले दिवस येतील. मग पुन्हा काही काळ खराब दिवस... हे असे चालूच राहील. पण जर तुम्ही सट्टेबाज (स्पेक्‍युलेटर) नसाल व दीर्घकालीन गुंतवणूकदार असाल तर निश्‍चिंत राहायला हरकत नाही. ‘एसआयपी’ व ‘एसटीपी’द्वारे गुंतवणूक करत राहावी. त्यातील सुमारे २५ टक्के भाग इंडेक्‍स फंडात गुंतवावा. काही काळानंतर कंपन्यांच्या मिळकतीत जशी वाढ होईल, तसा गुंतवणूकदारांना पण फायदा होईल. प्रसिद्ध तत्त्वज्ञ राल्फ ईमरसनचा सुविचार लक्षात ठेवा- ‘‘मनाने खुजी किंवा उथळ माणसे नशिबावर विश्‍वास ठेवतात, तर बलवान माणसे कारणमिमांसा करून त्याच्या परिणामांवर!’’

(डिस्क्‍लेमर ः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनांशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com