'इन्कम टॅक्‍स रिटर्न' भरण्याच्या मुदतीत वाढ; अंतिम मुदत आता...

टीम ई-सकाळ
मंगळवार, 23 जुलै 2019

- अर्थमंत्रालयाने प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत वाढवली. 

- 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत होती 31 जुलै.

नवी दिल्ली : अर्थमंत्रालयाने प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत वाढवली आहे. 2018-19 या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून वाढवून 31 ऑगस्ट करण्यात आली आहे. असंख्य करदात्यांना हा मोठाच दिलासा आहे. याआधी 31 जुलै ही प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत होती. अनेक सीए आणि कर सल्लागार यांनी सरकारकडे प्राप्तिकर विवरणपत्र  भरण्याची अंतिम मुदत वाढवण्याची विनंती केली होती. 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आर्थिक वर्ष संपल्यानंतर लगेच म्हणजे एक एप्रिल 2019 रोजी 32/2019 या अधिसूचनेद्वारे आर्थिक वर्ष 2018-19 म्हणजेच आकारणी वर्ष 2019-20 शी संबंधित सर्व प्रकारचे प्राप्तिकर विवरणपत्र फॉर्म सादर केले. 

यामध्ये आयटीआर फॉर्म नंबर 1 ते आयटीआय फॉर्म नंबर 7 चा समावेश आहे. पण, "बदल' ही एक नित्याची गोष्ट झाली आहे. आधी सादर केलेले प्राप्तिकर विवरणपत्राचे फॉर्मसुद्धा या नियमाला अपवाद ठरले नाहीत. थोडक्‍यात, या विवरणपत्रांमध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत, याची आपण माहिती घेऊया. 

- पगारापासून उत्पन्न असलेल्या व्यक्तींना आता आपले पगाराचे उत्पन्न जाहीर करताना विस्तारपूर्वक माहिती द्यावी लागणार आहे. थोडक्‍यात, मागील वर्षापर्यंत करमाफ असलेले भत्ते (वाहतूक भत्ता आदी) यांची वेगळी अशी रक्कम न दाखविता, निव्वळ पगारच जाहीर करावा लागायचा. परंतु, आता करदात्याला ढोबळ पगार आणि त्यातून मिळणारी वजावट हे सर्व वेगवेगळे घोषित करावे लागणार आहे. थोडक्‍यात, पगारदार व्यक्तींना आपल्या मालकाकडून मिळणाऱ्या फॉर्म 16 मधील रकमा विस्तारपूर्वक विवरणपत्रामध्ये भराव्या लागणार आहेत. 

- पगाराच्या उत्पन्नातून मिळणाऱ्या अन्य वजावटी म्हणजे रु. 40 हजारांची प्रमाणित वजावट (स्टॅंडर्ड डिडक्‍शन), करमणूक भत्ता, व्यवसाय कर या रकमासुद्धा करदात्याला आपल्या विवरणपत्रामध्ये वेगवेगळ्या दाखवाव्या लागणार आहेत. 

- पगाराव्यतिरिक्त बहुतेक करदात्यांना इतर माध्यमातूनसुद्धा (स्रोत) उत्पन्न मिळत असते. (उदा. ः व्याज, भाडे आदी). इतर स्रोतांपासून उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना आता आपले उत्पन्न कोणकोणत्या स्रोतांपासूनचे आहे, याची सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. उदा. ः करदात्याला त्याच्या बचत खात्यातून किती व्याज मिळाले, त्याच्या एफडी, आरडी आदी ठेवींपासून किती व्याज मिळाले, त्याला आपल्या प्राप्तिकर परताव्यावर (रिफंड) किती व्याज मिळाले, बाकी उत्पन्न (लाभांश आदी) किती मिळाले, याची माहितीही द्यावी लागणार आहे. 

- एखादी स्थावर मालमत्ता विकल्यास करदात्याला त्यावर झालेल्या भांडवली नफ्याचे (कॅपिटल गेन) मूल्यांकन करावे लागते. आता या भांडवली नफ्याची माहिती सविस्तर द्यावी लागणार आहे. यामध्ये खरेदीदाराच्या माहितीचे तपशील द्यावे लागणार आहेत. तसेच विक्री केलेल्या मालमत्तेचा पत्ता पिनकोडसह लिहावा लागणार आहे. याआधी विवरणपत्रामध्ये फक्त रक्कम मागितली जायची. परंतु, आता आपण आपली मालमत्ता कोणाला विकली, कितीला विकली, ती मालमत्ता कोठे होती, अशा बऱ्याच गोष्टींची माहिती देणे बंधनकारक केले गेले आहे. 

- आयटीआर फॉर्म नंबर 1 हा खूपच सरळ आणि सोपा आहे. ज्यांचे पगारापासूनचे एकूण उत्पन्न रु. 50 लाखांपेक्षा कमी आहे, ज्यांचे शेतीपासूनचे उत्पन्न पाच हजार रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यांना केवळ एकाच घरापासूनचे उत्पन्न आहे, असेच करदाते हा फॉर्म 1 भरू शकतात. तसेच, करदाते आयटीआर 1 आणि 4 या दोन फॉर्मसाठीची युटिलिटी डाऊनलोड न करता, थेट ई-फायलिंग संकेतस्थळावर आपला युजर आयडी म्हणजेच "पॅन' आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून ऑनलाइनसुद्धा दाखल करू शकतात. 

- आता फक्त अति ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्यांचे वय 80 वर्षांपेक्षा जास्त आहे, असेच करदाते आयटीआर फॉर्म 1 किंवा आयटीआर फॉर्म 4 मध्ये आपले विवरणपत्र प्राप्तिकर खात्याच्या कार्यालयात "पेपर फॉरमॅट'मध्ये म्हणजेच "मॅन्युअल रिटर्न' सादर करू शकतात. बाकी सर्व करदात्यांना ऑनलाइन म्हणजे प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावरून आपले विवरणपत्र "ई-फाइल' करणे अनिवार्य आहे. 

या वर्षी प्राप्तिकर खात्याने विवरणपत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. ते लक्षात घेऊन आपल्या विवरणपत्रामध्ये संपूर्ण आणि अचूक माहिती देणे, हे प्रत्येक करदात्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे आपली आवश्‍यक ती कागदपत्रे आणि माहिती लवकरात लवकर गोळा करून तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने आपापले विवरणपत्र वेळेत सादर करणे कधीही चांगले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deadline for filing IT Return is now August 31