विकासचक्र समजून घेत गुंतवणूक करणे गरजेचे!

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मागणी व पुरवठ्यातील बदलत्या समीकरणाबरोबर कंपन्यांचे विकासचक्र कालबद्ध पद्धतीने वाढीच्या किंवा घटीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असते. मागणी अधिक झाली की भाव वाढतो; त्यासोबत पुरवठाही वाढतो. पुरवठा वाढत असताना एकवेळ अशी येते की, पुरवठ्यापुढे मागणी स्थिर किंवा कमी होते आणि त्यानंतर मालाची साठवण होत असल्याने स्पर्धेपोटी कंपन्यांना नफ्याचे प्रमाण कमी करून मालाची विक्री करावी लागते. पुढे जाऊन उत्पादनही कमी केले जाते. येथून कंपन्यांच्या निकालात नफा व विक्री घटण्यास सुरवात होते. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमधून गुंतवणूकदार बाहेर पडावयास सुरवात करतात.

मागणी व पुरवठ्यातील बदलत्या समीकरणाबरोबर कंपन्यांचे विकासचक्र कालबद्ध पद्धतीने वाढीच्या किंवा घटीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असते. मागणी अधिक झाली की भाव वाढतो; त्यासोबत पुरवठाही वाढतो. पुरवठा वाढत असताना एकवेळ अशी येते की, पुरवठ्यापुढे मागणी स्थिर किंवा कमी होते आणि त्यानंतर मालाची साठवण होत असल्याने स्पर्धेपोटी कंपन्यांना नफ्याचे प्रमाण कमी करून मालाची विक्री करावी लागते. पुढे जाऊन उत्पादनही कमी केले जाते. येथून कंपन्यांच्या निकालात नफा व विक्री घटण्यास सुरवात होते. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांमधून गुंतवणूकदार बाहेर पडावयास सुरवात करतात. उलटपक्षी मागील अनेक वर्षांपासून ज्या क्षेत्रात मालाला मागणी कमी होत गेल्याने पुरवठाही कमी झालेला असतो, त्यात पुढे मागणी व पुरवठा समान होतो. अशावेळी कंपन्यांचे निकाल स्थिर येत असतात. ज्या वेळी पुन्हा मालाला मागणी वाढायला सुरवात होते, त्या वेळी पुरवठा वाढतो व अशा परिस्थितीत कंपन्यांच्या निकालात नफा व विक्री वाढण्यास सुरवात होते. गुंतवणूकदारांसाठी ही परिस्थिती आपल्या गुंतवणुकीला नव्या कंपन्यांमध्ये बदलण्याची असते. अशा वेळी शेअरमूल्य पाहता, अनेक वर्षांपासून वाढत असणाऱ्या कंपन्यांचे शेअरभाव अत्यंत महाग असतात व अनेक वर्षांपासून स्थिर असलेल्या कंपन्यांचे शेअरभाव खूप स्वस्त झालेले असतात. ज्या कंपनांच्या शेअरभावात अधिक वाढ झालेली असते, त्यातून नफा वसूल करीत नव्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. हे चक्र निरंतर चालू असते. 2005 पूर्वी औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांचे शेअरभाव अनेक वर्षे स्थिर होते. पुढे यात फार मोठी वाढ झाली. 1990 पासून पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली, हे सर्वांनी अनुभवले आहेच. आज हे क्षेत्र मध्यम गतीने वाढत आहे.

तांत्रिक पातळी...
शुक्रवारच्या दिवसअखेर "निफ्टी' 8362 अंशांच्या पातळीवर बंद झाला असून, तांत्रिक आलेखानुसार या पातळीपासून वरच्या दिशेने 8390 व 8430 अंशांवर अनुक्रमे विरोधी पातळ्या दिसत असून, 8320 व 8250 अंशांवर अनुक्रमे आधार पातळ्या दिसत आहेत. चालू आठवड्यासाठी "निफ्टी'ची पातळी 8250 ते 8430 अंश अशी दिसत असून; 7900 अंशांपासून सुरू झालेली बाजाराची वाढ 8470 अंशांपर्यंत झाल्यावर नफावसुली सुरू झाली आहे. 8250 अंशांपर्यंत हे "करेक्‍शन' होऊ शकते. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तोंडावर परत "निफ्टी'त 8580 अंशांच्या दिशेने वाढीस सुरवात होऊ शकते.

खरेदी करण्यासारखे
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. (आजचा भाव : रु. 56, उद्दिष्ट ः रु. 90)
केंद्र सरकारच्या मालकीची ही कंपनी असून, शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी खत व औषध बनविण्याचे उत्पादन या कंपनीत घेतले जाते. या कंपनीच्या शेअरमधील गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळण्यासाठी गुंतवणुकीचा कालावधी चार ते पाच वर्षांचा असावा. हा शेअर 2008 मध्ये रु. 150 वर होता, तेव्हा कंपनीच्या निव्वळ मालमत्तेनुसार प्रतिशेअरमूल्य रु. 20 होते; ते आज वाढत जाऊन रु. 52.43 झाले आहे. बाजारातील शेअरभाव अजूनही रु. 56.95 आहे. प्रत्येक तिमाहीत प्रतिशेअर रु. 1.25ने सरासरी शेअरमूल्य वाढत आहे. 2008 ते 2016 या काळात शेअरभाव व कंपनीचा ताळेबंद यांच्यात उत्तम कन्सॉलिडेशन झाले असल्याने शेअर खरेदी करण्यापूर्वी बघायची इतर गुणोत्तरीय प्रमाणे उत्तम पातळीवर आली आहेत. पुढील काळात सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारणार असल्याने, अनुदानापोटी अडकून राहत असलेली रक्कम वेळेत मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. सध्या केंद्र सरकारने सरकारी कंपन्यांची स्थावर मालमत्ता (पडीक जमीन) विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीकडे आजच्या प्रतिशेअर मूल्याच्या आठपट जमीन आहे. पुढे जेव्हा जमीनविक्रीचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा शेअरचा भावही त्याच पटीत वाढेल. पुढील एका वर्षात साधारणपणे प्रतिशेअर रु. 90 चा भाव मिळण्याची शक्‍यता राहील.

अंदाज खरा ठरला...
जेव्हा "निफ्टी' 8185 अंशांवर होता, तेव्हा पुढे "निफ्टी' 8480 अंशांपर्यंत वाढेल व तेथून परत बाजारात थोडे "करेक्‍शन' होऊ शकते, असे दोन जानेवारीच्या अंकापासून पुढील प्रत्येक लेखात लिहिले होते. 8470 अंशांपर्यंत "निफ्टी'त वाढ झाल्यानंतर बाजार घसरला आहे.

-राजेंद्र सूर्यवंशी
(डिस्क्‍लेमर: लेखक संशोधन विश्‍लेषक आहेत. त्यांनी आपल्या अभ्यासातून वरील मत व अंदाज व्यक्त केले आहेत. त्याच्याशी "सकाळ' सहमत असेलच, असे नाही. शेअर बाजारातील जोखीम लक्षात घेऊन वाचकांनी गुंतवणुकीबाबतचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घेणे अपेक्षित आहे.)

Web Title: demand and supply