रद्द झालेल्या 97 टक्के नोटा बँकांमध्ये पुन्हा दाखल

वृत्तसंस्था
गुरुवार, 5 जानेवारी 2017

देशभरातील बँकांकडे 30 डिसेंबर, 2016 पर्यंत 14.97 लाख कोटी रुपयांची रक्कम ठेवींच्या स्वरुपात दाखल झाली आहे. हा तात्पुरता आकडा असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील सुत्रांनी गुप्ततेच्या अटीवर दिली आहे. 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने बाद ठरविलेल्या चलनी नोटांपैकी तब्बल 97 टक्के नोटा बँकांमध्ये जमा करण्यात आल्या आहेत, अशी आकडेवारी आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेतमार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे काळ्या पैशाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. 

देशभरातील बँकांकडे 30 डिसेंबर, 2016 पर्यंत 14.97 लाख कोटी रुपयांची रक्कम ठेवींच्या स्वरुपात दाखल झाली आहे. हा तात्पुरता आकडा असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती बँकिंग क्षेत्रातील सुत्रांनी गुप्ततेच्या अटीवर दिली आहे. 

भ्रष्टाचार आणि काळा पैशाविरोधात कठोर पावले उचलत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत आर्थिक व्यवहारातून पाचशे व हजारांच्या नोटा बाद झाल्याची घोषणा केली होती. परंतु, प्रामाणिक नागरिकांना उत्पन्नाचा पुरावा दाखविल्यास या नोटा पुन्हा बँकांमध्ये जमा करुन घेतील असे आश्वासन देण्यात आले होते. त्याचप्रमाणे, गृहिणींच्या घरगुती बचतीवर शंका उपस्थित करण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले होते.

नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी देशात 15.44 लाख कोटी रुपयांच्या नोटा रद्दबातल ठरविण्यात आल्या होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demonetisation complete failure? 97% of banned notes back in banks: Report