"डीएचएफएल'चे संचालक मंडळ बरखास्त

dhfl
dhfl

मुंबई ः कर्जरोख्यांचा परतावा देण्यास अपयशी ठरलेल्या दिवाण हौसिंग फायनान्स लिमिटेडचे (डीएचएफएल) संचालक मंडळ बरखास्त करण्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी (ता. 11) केली. रिझर्व्ह बॅंकेने "डीएचएफएल'वर आर. सुब्रमणीकुमार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली असून लवकरच दिवाळखोरी आणि नादारी विधेयकानुसार (आयबीसी) दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, "आयएल ऍण्ड एफएस'नंतर आणखी एक वित्त सेवा क्षेत्रातील कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहचल्याने बिगरबॅंकिंग वित्त सेवा क्षेत्राची अवस्था आणखी बिकट झाली आहे. 

बॅंकेकडून घेतलेली 31 हजार कोटींची कर्जे शेल कंपन्यांमध्ये (बनावट कंपन्या) गुंतवल्याचा आरोप झाल्यानंतर "डीएचएफएल' गोत्यात आली होती. रोकड टंचाईमुळे म्युच्युअल फंड कंपन्या, बॅंका, बॉंडधारक आणि इतर धनकोंची कर्जांची परतफेड करण्यास कंपनीला अपशय येत होते. दरम्यान, "डीएचएफएल'च्या संचालक मंडळाने खासगी संस्थांच्या माध्यमातून कंपनीचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर करून 15 हजार कोटी फेडण्याचा प्रस्ताव कंपनीने सादर केला होता. 

एका संस्थेच्या दाव्यानुसार "डीएचएफएल'वर तब्बल एक लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. संचालकांनी कंपनीतून मोठ्या प्रमाणात निधी इतरत्र वळवला असल्याचा संशय कंपनी व्यवहार खात्याने केलेल्या चौकशीत व्यक्त करण्यात आला आहे. कंपनीतील आर्थिक गैरव्यवहारांसंदर्भात गंभीर गुन्हे तपास पथकाकडून चौकशी केली जात आहे. आज रिझर्व्ह बॅंकेने "डीएचएफएल'चे संचालक मंडळ बरखास्त करत त्यावर प्रशासकाची नियुक्ती केली. 
--- 
वाधवा कुटुंबियांच्या अडचणी वाढणार 
"डीएचएफएल'चे मुख्य प्रवर्तक असलेल्या वाधवा कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. वाधवा कुटुंबियांची "डीएचएफएल'मध्ये 39 टक्के मालकी आहे. यापूर्वीच वाधवा कुटुंबियांविरोधात कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा तसेच धीरज वाधवा यांची सक्तसवुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली होती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com