आठवड्यात कमी चढ-उताराचा शेअर बाजार

दिवाकर कुलकर्णी
सोमवार, 24 एप्रिल 2017

सेन्सेक्‍सने अजून तरी 29000 व निफ्टीने 9000 चा डेटम टिकवला आहे. पुढील काही दिवसांत काही चांगल्या ट्रिगरचे निमित्त साधून हे दोन्ही निर्देशांक शेअर मार्केटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वोच्च निर्देशांकाला पोचू शकतात.

टी-20 क्रिकेट आणि शेअर बाजार या दोन्हीचाही समान स्थायिभाव आहे. तो म्हणजे चढ-उतार, चैतन्य आणि त्याचे सनसनाटीपण. प्रत्येक बॉलला प्रेक्षकांना हवी असते सिक्‍सर, बाउंड्री किंवा विकेट! शेअर बाजाराच्या बाबतीतही डेली ट्रेडरना पाहिजे असते निमिषार्धातील शंभर- दीडशे पॉइंटची वधघट! नाही म्हणायला बाजारात 'चिअर गर्ल्स' नसतात, निदान अजूनतरी! हा म्हटलं तर एक फरक! 

याच्या तुलनेत गेल्या दोन आठवड्यांत बाजाराचे स्वरूप 20-20 न राहता टेस्ट मॅचचे राहिले होते. बरेचसे सुस्त. बाजार दीडशे दोनशे पॉइंट (निफ्टी) वर-खाली होत राहिला होता. शुक्रवारी बाजार 29356 (सेन्सेक्‍स) असा 57 पॉइंटने बंद झाला. 

सेन्सेक्‍सने अजून तरी 29000 व निफ्टीने 9000 चा डेटम टिकवला आहे. पुढील काही दिवसांत काही चांगल्या ट्रिगरचे निमित्त साधून हे दोन्ही निर्देशांक शेअर मार्केटच्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वोच्च निर्देशांकाला पोचू शकतात. निदान सर्वच गुंतवणूकदारांची तशी मनोमन इच्छा आहे. जामनगर इथल्या स्वतःच्या दुसऱ्या व अखेरच्या टप्प्याचे बिनचूक कमिशनिंग रिलायन्सकडून झाल्याने, शुक्रवारी रिलायन्स शेअर 2.2 टक्के वाढला. हाच शेअर असाच वाढत राहून इंडेक्‍सला आभाळाला हात लावायला मदत करेल, असा बाजाराचा होरा आहे. 

बुधवारी मदिरा सम्राट विजय मल्ल्याला लंडनमध्ये अटक झाली. 9000 कोटी रुपये कर्ज वसुलीसंदर्भात; पण कायदा कोळून प्यायलेल्या त्याने अतितत्काळ जामीन मिळवला. ही बातमी वाहिन्यांवर झळकली आणि त्याक्षणी युनायटेड स्पिरिट आणि युनायटेड ब्रिव्हरीज हे वारुणी समभाग 2.5 टक्‍क्‍यांनी कोसळले. पण लगेच सुटकेची बातमी टीव्हीवर झळकली. शेअर मार्केटची संवेदनशीलता विजेच्या वेगावरही मात करते याचा प्रत्यय आला. मल्ल्याच्या मिळकती लिलावातून हे 9000 कोटी रुपये वसूल करावयाचे आहेत. पण या मिळकती घ्यायला कोणी पुढेच येत नाही. कारण संभाव्य कायदेशीर कटकटी! 

'आमची कोठेही शाखा नाही.' 'मला शेअर मार्केटमधील काही कळत नाही.' अनेकदा कानावर येणारी मराठी माणसाची अशी प्रककनं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पुढे पुढे जायच्या वृत्तीचा अभाव. 'ठेविले अनंते तैसेची रहावे' या वृत्तीचे बाळकडू! हे आता तरी सोडायला हवे! 

बॅंकेत पैसे ठेवून तुम्ही काय मिळवणार? 4 ते 6 टक्के उत्पन्न, तेही अर्थमंत्री अरुण जेटलींच्या कृपेमुळे टॅक्‍सेबल! बॅंकांच्या वाढीव सेवा शुल्कामुळे बॅंकांतल्या ठेवीवर यापुढे उणे मोबदला मिळाल्यास आश्‍चर्य वाटू नये. त्यामुळे गुंतवणूक हा विषय मराठी माणसानं सजगतेनं घ्यायला हवा (ती फक्त एका वर्गाची मक्तेदारी राहू नये). 

पर्याय? म्युच्युअल फंड्‌स, एसआयपी. आकडेवारी असे सांगते, की गेल्या दशकात एसआयपीने 15 ते 21 टक्के मोबदला गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला आहे. बॅंकेच्या व्याजाच्या तुलनेतच निव्वळ नव्हे तर एकूण शेअर बाजाराने दिलेल्या मोबदल्यापेक्षाही एसआयपीने दिलेला मोबदला दोन ते चारपट अधिक आहे या माध्यमातून. म्हणून मी सर्वांना एसआयपीची शिफारस करतो. (अर्थात दीर्घ मुदत नजरेसमोर ठेवून) 

20-20 क्रिकेट आणि शेअर बाजार याचा उल्लेख वर केलाच आहे. सुनील नारायण या वेस्ट इंडिज खेळाडूने परवा आयपीएलमध्ये एकही सिंगल डबल धाव न घेता फक्त सिक्‍सर व बाउंड्रीने कोलकता नाइट रायडर्सकडून खेळताना याने 17 बॉलमध्ये 42 धावा (9 बाउंड्रीज, 1 सिक्‍सर) कुटल्या. हा एक अनोखा जागतिक विक्रम. 

असाच एक विक्रम सोमवारच्या शेअर बाजारानेही अनुभवला. इंडिया बुल रिअल इस्टेट हा शेअर एका दिवसात 105 रुपयांपासून 151 रुपयांपर्यंत वाढला. दिवसातली वाढ फक्त 40 टक्के! दिवसात तीन वेळा लागलेल्या सर्किटची कंपनी, व्यवसायाचे डी मर्जर करणार असल्यामुळे हा अनोखा प्रकार घडला. 

जैन इरिगेशन, रेमंड, फॉर्टीज हेल्थ केअर, स्पाइस जेट, रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागांनीही हा आठवडा गाजवला. 'बहरला पारिजात दारी!' ही काव्योक्ती लक्षात घेतल्यास आपल्या कोल्हापूर परिसरातील मेनन बेअरिंग, मेनन पिस्टन, इंडो काउंट, रत्नाकर बॅंक, मनुग्राफ, युरोटेक्‍स या शेअरवर आपण ध्यान केंद्रित का करू नये? नव्हे कराच! हॅपी इन्व्हेस्टिंग!

Web Title: Diwakar Kulkarni writes about Share Market performance