गुरुवारी अमेरिकेत चलनवाढीचा ३० वर्षांतील उच्चांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेत चलनवाढीचा ३० वर्षांतील उच्चांक

अमेरिकेत चलनवाढीचा ३० वर्षांतील उच्चांक

मुंबई : अमेरिकेतील चलनवाढ तीस वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यामुळे आज जागतिक शेअर बाजारांमध्ये संमिश्र पडसाद उमटले. नॅसडॅक पावणेदोन टक्क्यांनी कोलमडला तर आशियातील तैवान, कोरिया व भारतीय शेअर बाजारांनी घसरण अनुभवली. युरोपीय शेअर बाजारांनी अल्प वाढ नोंदवली. तेथील कंपन्यांचे निकाल चांगले आल्याने गुंतवणुकदारांनी अमेरिकेची आकडेवारी दुर्लक्षून खरेदी केली.

अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा ६.२ टक्के वाढल्याचे दिसून आले. १९९० नंतरची ही सर्वांत जास्त वाढ आहे. सप्टेंबर महिन्यापेक्षा ऑक्टोबर महिन्यातील चलनवाढ ०.९ टक्के जास्त होती. ही वाढ ०.६ टक्के राहील, अशीच सर्वांची अपेक्षा होती. ही वाढ अशीच कायम राहिली तर अमेरिकी सरकार व फेडरल रिझर्व्ह यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चलनवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी प्राधान्याने उपाय योजण्याची ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली. चलनवाढीचा फटका आयटी कंपन्यांना बसण्याच्या भीतीने अमेरिकी आयटी निर्देशांक नॅसडॅकमध्ये मोठी घसरण झाली. पण, उलट याचा फायदा होऊ शकणाऱ्या बँकांच्या शेअरचे भाव वाढले. डाऊ जोन्स देखील अर्ध्या टक्क्यांहून जास्त घसरला होता.

मार्च २०२० पासूनची सर्वात मोठी वाढ

आज कमोडिटीचे भाव या परिस्थितीतही चढेच होते. लंडनचा मेटल इंडेक्स ०.८ टक्के वाढला. कच्च्या तेलाचे भावही कमी (८१ ते ८२ डॉलर प्रति पिंप) झाले. अमेरिकेत चलनवाढ झाल्याने सोन्याचे भावही वाढले. डॉलर निर्देशांकही एक टक्का वाढला, मार्च २०२० पासूनची ही सर्वात मोठी वाढ आहे. बिटकॉईनचे भाव देखील नरमगरम होते.

निर्देशांकांची घसरगुंडी

जागतिक नकारात्मक वातावरणामुळे आज भारतीय शेअर बाजारात निर्देशांकांची मोठी पडझड पाहायला मिळाली. सेन्सेक्स गुरुवारी ४३३.१३ अंशांनी; तर निफ्टी १४३.६० अंशांनी गडगडले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ५९,९१९ अंशावर येऊन बंद झाला; तर निफ्टी १७,८७३ अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्सच्या ३० शेअरपैकी आज फक्त सहा शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली; तर २४ शेअर कोलमडले.

loading image
go to top