कोणते प्राप्तिकर विवरणपत्र घेऊ हाती? 

Income Tax return
Income Tax return

आर्थिक वर्ष 2016-17 संपून आता तीन महिने उलटून गेले आहेत. आता सर्व करदात्यांना वेध लागले आहेत ते प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कमटॅक्‍स रिटर्न) दाखल करण्याचे. प्राप्तिकर कायद्यात होणाऱ्या वारंवार बदलांमुळे बऱ्याच करदात्यांना अजूनही विवरणपत्र भरताना काय तरतुदी आहेत, याची पुरेशी जाण असत नाही. सबब चुकीचे उत्पन्न विवरणपत्रात दाखविले जाते किंवा चुकीचेच विवरणपत्र भरले जाते. प्राप्तिकर विभागास अशा त्रुटी लक्षात आल्यास कर व दंड वसूल केला जाऊ शकतो. यंदाच्या वर्षी काही महत्त्वाच्या बाबी विवरणपत्रात विषद करणे गरजेचे आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणत्या करदात्याने कोणते विवरणपत्र भरले पाहिजे, ते भरताना कोणती काळजी घेतली पाहिजे, हे समजून घेण्याचा हा प्रयत्न... 

आर्थिक वर्ष 2016-17 संपून आता तीन महिने उलटून गेले आहेत. आता सर्व करदात्यांना वेध लागले आहेत ते प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कमटॅक्‍स रिटर्न) दाखल करण्याचे. प्रत्येक पगारदार व्यक्तीस, निवृत्तिवेतन मिळणाऱ्या कनिष्ठ/ज्येष्ठ नागरिकास, केवळ घरभाडे व इतर उत्पन्न असणाऱ्या इतर करदात्यांना, ज्यांची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांपर्यंत असलेल्या छोट्या व्यावसायिकांना वा ज्यांचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा अधिक असेल अशा करदात्यांना आर्थिक वर्ष 2016-17 संपल्यापासून चार महिन्यांच्या आत म्हणजे 31 जुलै 2017 पूर्वी प्राप्तिकर विवरणपत्र दाखले करणे आवश्‍यक आहे. जर या तारखेनंतर विवरणपत्र भरले तर जास्तीत जास्त रु. 5000 दंडाच्या शक्‍यतेसह 31 मार्च 2018 पर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल, हे करदात्यांनी लक्षात ठेवायला हवे. परदेशात चल/अचल संपत्ती वा आर्थिक हितसंबंध असेल, तर आपले उत्पन्न करपात्र नसतानादेखील विवरणपत्र दाखल करावे लागण्याचे सक्तीचे कायदेशीर बंधन आहे, हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. 

निकष काय आहेत? 
ज्या सर्वसाधारण करदात्याचे कलम 10 अंतर्गत माफ असलेले उत्पन्न वजा करून; परंतु कलम 80 अंतर्गत मिळणाऱ्या वजावटीअगोदर उरलेले ढोबळ उत्पन्न रु. अडीच लाखांपेक्षा अधिक असेल आणि प्राप्तिकर देय नसेल वा पूर्णपणे भरला असेल, तर त्यांना विवरणपत्र भरणे आवश्‍यक आहे. ज्येष्ठ नागरिकांबाबत ही रक्कम रु. तीन लाख, तर अतिज्येष्ठ नागरिकांबाबत ही रक्कम रु. पाच लाख इतकी आहे. कलम 87 ए खाली जरी करसवलत मिळत असली, तरी ही सवलत प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याशिवाय मिळत नाही, हे ध्यानात घेतले पाहिजे. याखेरीज करपात्र उत्पन्न नसताना उद्‌गम करामुळे प्राप्तिकर कापला गेला असेल तरीही किंवा परतावा मिळण्यासाठी त्या करदात्यास विवरणपत्र भरणे आवश्‍यक आहे व ते न भरल्यास प्राप्तिकर विभागाकडून विचारणा होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. हे निकष सोबतच्या तक्‍त्यावरून अधिक स्पष्ट होतील. 

प्राप्तिकर कायद्यात होणाऱ्या वारंवार बदलांमुळे बऱ्याच करदात्यांना अजूनही विवरणपत्र भरताना काय तरतुदी आहेत, याची पुरेशी जाण असत नाही. बॅंकेने त्यांच्या मुदत ठेवी किंवा आवर्ती ठेवींवर दहा टक्के दराने उद्‌गम कर (टीडीएस) कापला, की त्या उत्पन्नावर कर भरला गेला आहे व आता त्या उत्पन्नावर कर देण्याची गरज नाही, अशा चुकीच्या समजुतीवर या उत्पन्नाचा समावेश एकूण उत्पन्नात केला जात नाही, सबब चुकीचे उत्पन्न विवरणपत्रात दाखविले जाते. जी बाब ठेवींवरील व्याजाची तीच बाब अल्पबचत गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची. हे उत्पन्न दरवर्षी घोषित करणे गरजेचे असते, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. प्राप्तिकर विभागास अशा त्रुटी लक्षात आल्यास कर व दंड वसूल केला जाऊ शकतो. तथापि, यंदाच्या वर्षी काही महत्त्वाच्या बाबी विवरणपत्रात विषद करणे गरजेचे आहे. त्यात चूक झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात. नोटाबंदीच्या कालावधीत करदात्याच्या खात्यात किती रोख रक्कम भरण्यात आली आहे, याची माहिती यंदाच्या वर्षी फार महत्त्वाची माहिती मानली जाणार आहे. ती कोणत्या खात्यात भरली आहे व हे खाते पूर्वीच्या विवरणपत्रात घोषित केले होते की नाही, याचीही माहिती तपासली जाणार आहे. जर भरलेली रक्कम रु. दोन लाखांपेक्षा अधिक असल्यास या रकमेच्या स्त्रोताबद्दल चौकशी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. चुकीची माहिती प्राप्तिकर विभागास दिल्यास अघोषित उत्पन्नाच्या 50 ते 200 टक्‍क्‍यांपर्यंत दंड आकाराला जाऊ शकतो. याखेरीस निवासी करदात्याचे परदेशात असणारे उत्पन्न तसेच स्थावर व जंगम मालमत्तेचा पूर्ण तपशील देणे बंधनकारक करण्यात आले आहे. पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्न झाल्यास करदात्याच्या मालमत्तेची माहिती विवरणपत्रात भरणे आवश्‍यक मानले गेले आहे. 

कोणते विवरणपत्र भरले पाहिजे? 
"सहज' विवरणपत्र नमुना 1 : पन्नास लाख रुपयांपर्यंत करपात्र वेतन किंवा/आणि निवृत्तिवेतन मिळणाऱ्या करदात्यास "सहज' विवरणपत्र नमुना 1 या सुटसुटीत फॉर्ममध्ये प्राप्तिकर विवरणपत्र भरता येईल. त्यात एका घरापासून मिळणारे उत्पन्न; तसेच मुदत, बचत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज/लाभांशाचे उत्पन्न समाविष्ट करता येईल. मात्र करदात्यास एकापेक्षा अधिक घरापासून उत्पन्न मिळत असल्यास वा पन्नास लाख रुपयांपेक्षा अधिक करपात्र उत्पन्न असल्यास वा पाच हजार रुपयांपेक्षा अधिक शेतीपासून उत्पन्न मिळत असल्यास वा गेल्या वर्षीचा तोटा पुढे ओढावयाचा असल्यास वा धंदा किंवा व्यवसायापासून उत्पन्न मिळत असल्यास वा करपात्र भांडवली नफा मिळाला असल्यास वा परदेशात स्थावर/जंगम मालमत्ता असल्यास हे "सहज' विवरणपत्र भरता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. 
विवरणपत्र नमुना 2 : जर करदात्याला वेतन आणि/किंवा निवृत्तिवेतन मिळत असेल, घरांपासून उत्पन्न मिळत असेल, अल्प/दीर्घकालीन भांडवली नफ्यातून उत्पन्न मिळाले असेल, इतर स्रोतांतून उत्पन्न मिळाले असेल, परदेशात स्थावर/जंगम मालमत्ता असल्यास व त्यावर काही उत्पन्न मिळाले असेल, फर्ममध्ये भागीदार म्हणून मिळालेले उत्पन्न असल्यास, व्यक्तीचे पाच हजार रुपयांपेक्षा अधिक शेतीपासून उत्पन्न मिळत असल्यास, गेल्या वर्षीचा तोटा पुढे ओढावयाचा असल्यास हे विवरणपत्र भरता येईल. परंतु धंदा किंवा व्यवसायापासून उत्पन्न मिळत असल्यास हे विवरणपत्र भरता येणार नाही. 

विवरणपत्र नमुना 3 : जर करदाता व्यक्ती असेल किंवा हिंदू अविभक्त कुटुंब पद्धती असेल व स्वतः व्यवसाय किंवा धंदा करीत असेल, तर या नमुन्यात विवरणपत्र दाखल करावे लागेल. या विवरणपत्रात इतर सर्व उत्पन्न म्हणजे, वेतन, निवृत्तिवेतन, भांडवली नफ्यापासून मिळणारे उत्पन्न, इतर स्रोतांतून मिळाले उत्पन्न असेल, परदेशात स्थावर/जंगम मालमत्ता असल्यास व त्यावर काही उत्पन्न मिळाले असेल, तर हे विवरणपत्र भरता येईल. 

उशिराने भरण्याचे परिणाम 
1) परताव्यावरील व्याजात होणारी घट ः जर विवरणपत्र वेळेत दाखल केले तर येणाऱ्या परताव्यावर (रिफंड) एक एप्रिल 2017 पासून करनिर्धारणा होण्याच्या तारखेपर्यंतचे व्याज देण्यास प्राप्तिकर विभाग बांधील आहे. परंतु विवरणपत्र उशिराने भरले तर ज्या तारखेला विवरणपत्र भरले असेल, त्या तारखेपासून करनिर्धारणा होण्याच्या तारखेपर्यंतचेच व्याज मिळते व म्हणून आर्थिक नुकसान संभवते. थोडक्‍यात, किमान चार महिन्यांचे सहा टक्के दराने व्याज बुडू शकते, ही वास्तवता लक्षात ठेवायला हवी. 
2) धंद्यातील तोटा पुढे ओढणे ः जर प्राप्तिकर विवरणपत्र अंतिम देय तारखेच्या आत दाखले केले नाही, तर त्या वर्षाचा धंद्यात होणारा आर्थिक तोटा घसारा रक्कम सोडून पुढील वर्षात होणाऱ्या नफ्यातून वजा करण्यासाठी पुढे ओढता येत नाही. हा धंदा करणाऱ्या करदात्यांचा मोठा आर्थिक तोटा आहे. तथापि, घरापासून होणाऱ्या तोट्यासंदर्भात हा नियम लागत नाही. 3) स्वयंनिर्धारणा करावरील व्याजाचा भुर्दंड ः करदात्याने आर्थिक वर्षातील उत्पन्नावर, विवरणपत्र दाखल करायच्या वा 31 जुलै 2017 यात जी तारीख लवकर येईल, त्या तारखेच्या आत स्वयंनिर्धारण कर भरणे कायद्याच्या कलम 140ए अंतर्गत अपेक्षित आहे. संबंधित करदात्यास आगाऊ कर भरण्याच्या संदर्भातील अटी लागू नसतील, तर देय असणाऱ्या कराच्या रकमेवर आर्थिक वर्ष संपल्यापासून 31 जुलैपर्यंतचे व्याज द्यावे लागत नाही. मात्र विहित मुदतीत विवरणपत्र न भरल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 234ए अंतर्गत कर देयतेवर कर भरणा करण्याच्या तारखेपर्यंत 12 टक्के दराने व्याजाचा भुर्दंड पडतो, हे ध्यानात घ्यायला हवे. 
4) प्राप्तिकर कायद्यातील कलम 10 व 80 अंतर्गत मिळणारी सवलत ः प्राप्तिकर कायद्यातील कलम 10ए व 10बी अंतर्गत मिळणारे उत्पन्न विवरणपत्र दाखल केल्याशिवाय करमुक्त होत नाही. तसेच कलम 80 आयए, 80 आयबी, 80 आयसी, 80 आयडी, 80 आयई अंतर्गत उत्पन्नातून मिळणाऱ्या वैध वजावटी विवरणपत्र भरल्याशिवाय मिळणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. 
5) व्हिसा मिळविताना येणाऱ्या अडचणी ः ज्या करदात्यांना परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळवायचा असतो, त्यांनी वेळेवर विवरणपत्र भरले आहे की नाही, हे संबंधित अधिकाऱ्यांकडून तपासले जाते. एकदम दोन विवरणपत्रे भरणाऱ्यांना कधी कधी व्हिसा मिळत नाही, असा अनुभव आहे. 
6) गृह किंवा वाहन कर्ज मिळविताना येणाऱ्या अडचणी ः ज्या करदात्यांना गृह व वाहन कर्ज घ्यायचे असेल, तर कोणतीही बॅंक सर्वसाधारणपणे कर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे प्राप्तिकर विवरणपत्राच्या व इतर निकषांच्या आधारे ठरवितात. तथापि, जर एखाद्या करदात्याने एकदम दोन विवरणपत्रे भरली असतील, तर संबंधित व्यक्तीने फक्त कर्ज काढण्याठीच ते भरले आहे व म्हणून ते खरे नसावे, असा ग्रह होतो, असा अनुभव आहे व म्हणून देय तारखेच्या आत विवरणपत्र भरणे अत्यंत गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com