नव्या बदलांमुळे ज्येष्ठांना अच्छे दिन! 

नव्या बदलांमुळे ज्येष्ठांना अच्छे दिन! 

केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात जर व्याजाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत असेल तर उद्‌गमकर कपात (टीडीएस) करू नये, असे निर्देश दिले होते. गतवर्षी ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर कायदा कलम 80 टीटीबी अंतर्गत मुदत व इतर ठेवींवर मिळणारे 50 हजार रुपयांचे व्याज वजावटीस पात्र ठरविल्याच्या संदर्भात झालेला हा बदल सुसंगतच होता. यासाठी केंद्र सरकारने बॅंका व टपाल (पोस्ट) कार्यालयांचे लक्ष कलम 194 एच्या उपकलम 3 मधील तृतीय तरतुदीकडे वेधले होते. सबब, ज्येष्ठ नागरिकांच्या व्याजाची रक्कम 50 हजार रुपयांपर्यंत "15 एच' फॉर्म न देता सुद्धा करकपातीस पात्र होऊ शकणार नाही, हे अधोरेखित झाले होते. या बदलाला साजेसा आणखी एक मूलभूत बदल केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) नुकताच म्हणजे 22 मे 2019 रोजी केला.

नियमातील महत्त्वाचे बदल 
प्राप्तिकर नियमांमध्ये बदल करून कलम 80 अंतर्गत मिळणाऱ्या सर्व वजावटी आणि साडे बारा हजार रुपयांची करकपात विचारात घेता, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये जर ज्येष्ठ नागरिकाचे करपात्र उत्पन्न पाच लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर अशा ज्येष्ठ व्यक्ती "15 एच' फॉर्म भरू शकतील व त्यांची करकपात होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या बदलामुळे किमान तीन कोटी ज्येष्ठ नागरिकांना "अच्छे दिन' येऊन मोठा दिलासा मिळणार आहे. हे फॉर्म दाखल केल्याने प्राप्तिकराचा परतावा (रिफंड) मागण्यासाठी त्यांना विवरणपत्र दाखल करण्याची खटपट करावी लागणार नाही. ज्येष्ठांच्या करपात्र नसणाऱ्या उत्पन्नावरील कराचे परतावे परत देण्यासाठी लागणारा प्राप्तिकर विभागाचा वेळ, मेहनत, व्याज वाचू शकते. 

कनिष्ठ नागरिकांनाही लाभ 
या खेरीस यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पूर्वी "टीडीएस'साठी आवश्‍यक असणारी व्याजाची किमान मर्यादा कनिष्ठ नागरिकांसाठी 10 हजार रुपयांवरून 40 हजार रुपयांपर्यंत वाढविली आहे. याचा फायदा कनिष्ठ नागरिकांना होऊन त्यांचे व्याजाचे उत्पन्न 40 हजार रुपयांपर्यंत "15 जी' फॉर्म न देतासुद्धा करकपातीस पात्र होणार नाही. याचा अर्थ ते उत्पन्न करमुक्त आहे, असा घेता कामा नये. इतर उत्पन्न व्याजासह सर्व वजावटीच्या पात्रतेसह करपात्र रकमेपेक्षा अधिक झाल्यास प्राप्तिकर भरावा लागणार आहे. थोडक्‍यात, पूर्वीसारखीच दोन अटींची पूर्तता कनिष्ठ नागरिकांच्या बाबतीत होणे आवश्‍यक आहे. वार्षिक व्याजाचे अंदाजे उत्पन्न करपात्र नको व व्याजाच्या स्रोतातून येणारे ढोबळ उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये. 

"पॅन' नसेल तर.... 
अनिवासी व्यक्तीस करपात्र उत्पन्न नसताना देखील 15 जी किंवा 15 एच फॉर्म भरता येत नाही. "पॅन' नसणाऱ्या ज्येष्ठ वा कनिष्ठ व्यक्तींना, तर हिंदू अविभक्त कुटुंबाचा (एचयूएफ) कर्ता जरी ज्येष्ठ नागरिक असला, तरी हा 15 एच फॉर्म भरता येत नाही. "पॅन' न लिहिता असे फॉर्म भरल्यास प्राप्तिकर कायद्याच्या कलम 206 एए अंतर्गत 20 टक्‍क्‍यांनी करकपात होते, हे लक्षात ठेवावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com