माझिया मना, जरा थांब ना!

एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपल्या मनातील भय, ईर्षा, आनंद, लालसा यांसारख्या सर्व भावना आपल्याला योग्य प्रकारे नियंत्रित कराव्या लागतात.
Dr Virendra Tatke writes to be successful investor paitence and pshycology require share market tips
Dr Virendra Tatke writes to be successful investor paitence and pshycology require share market tips Sakal
Summary

शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार होता येते, असे नाही. यशस्वी होण्यासाठी गुंतवणूकदाराची मानसिकतादेखील तेवढीच महत्त्वाची असते. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपल्या मनातील भय, ईर्षा, आनंद, लालसा यांसारख्या सर्व भावना आपल्याला योग्य प्रकारे नियंत्रित कराव्या लागतात.

गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडल्या. एका बाजूला ‘एलआयसी’चा बहुचर्चित ‘आयपीओ’ बाजारात दाखल झाला; परंतु अपेक्षित कामगिरी करू शकला नाही. दुसऱ्या बाजूला एप्रिल महिन्यात ६०,००० अंशांची पातळी पार केलेला ‘सेन्सेक्स’ दहा ते बारा टक्क्यांनी घसरून ५३,००० ते ५४,००० च्या आसपास घुटमळताना दिसला. यामुळे थोड्या कालावधीत मोठा फायदा कमविण्याची इच्छा बाळगून बाजारात प्रवेश केलेले अनेक गुंतवणूकदार बाजारात अडकून पडले. यावरून लक्षात येते, की फक्त आकडेवारी आणि किचकट समीकरणे समजली म्हणजे शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार होता येते, असे नाही. यशस्वी होण्यासाठी गुंतवणूकदाराची मानसिकतादेखील तेवढीच महत्त्वाची असते. एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपल्या मनातील भय, ईर्षा, आनंद, लालसा यांसारख्या सर्व भावना आपल्याला योग्य प्रकारे नियंत्रित कराव्या लागतात. आपण पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो, याचा प्रत्येक गुंतवणूकदाराने विचार करावा आणि आपल्या मानसिकतेत आवश्यक तो बदल करावा.

चंचल गुंतवणूकदार

असा गुंतवणूकदार शेअर बाजारात कायम सक्रिय राहण्याचा प्रयत्न करत असतो. बाजारात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला प्रतिसाद देण्याची आपली वैयक्तिक जबाबदारी आहे, असे याला वाटत असते. त्यामुळे बाजारात येणाऱ्या प्रत्येक ‘आयपीओ’साठी तो अर्ज करतो आणि प्रत्येक नव्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतो. अशा गुंतवणूकदाराचे गुंतवणूक नियोजन बाजारातील चढ-उतारांनुसार बदलत असते. शेअर बाजारातील गुंतवणुकीचा अभ्यास करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्व तंत्रांचा वापर करून असा गुंतवणूकदार सातत्याने गुंतवणुकीसाठी नवा शेअर शोधून काढतो आणि आपल्याकडील जुने शेअर विकत राहतो.

निराशावादी गुंतवणूकदार

हा गुंतवणूकदार शेअर बाजाराविषयी कायम नकारात्मक भावना ठेवून गुंतवणूक करत असतो. जगभरात घडणाऱ्या फक्त नकारात्मक घटनांचा तो कायम आढावा घेत असतो आणि त्या घटनांचा आपल्या गुंतवणुकीवर कसा विपरीत परिणाम होईल, हे तो सतत शोधत असतो. आपण गुंतवणूक केलेल्या शेअरचा भाव पडणार तर नाही ना, अशी भीती या गुंतवणूकदाराच्या मनात कायम घर करून असते. त्यामुळे गुंतवणूक केलेल्या शेअरचा बाजारभाव थोडा जरी पडला तरी असा गुंतवणूकदार तो शेअर लगेच विकून टाकतो. याउलट अशा शेअरचा बाजारभाव वाढला तरी वाढलेला बाजारभाव टिकून राहील की नाही या भीतीने तो असा शेअरदेखील लगेच विकून टाकतो.

आळशी गुंतवणूकदार

या गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याचा खूप आळस असतो. आपल्या पोर्टफोलिओपैकी कोणते शेअर नफ्यात आहेत आणि कोणते तोट्यात चालले आहेत, याचा याला पत्ता नसतो. कोणाच्या तरी सांगण्यावरून खरेदी केलेले शेअर आणि म्युच्युअल फंड त्याच्या डि-मॅट खात्यावर वर्षानुवर्षे पडून असतात. त्याच्या या आळशी स्वभावामुळे त्याचे खूप नुकसान होत असते; पण त्याची त्याला जाणीव नसते.

संतुलित गुंतवणूकदार

शेअर बाजारातील गुंतवणुकीचे या गुंतवणूकदाराचे स्वतःचे नियोजन असते. हे नियोजन करताना तो विविध माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग करतो. मात्र त्याचा अंतिम निर्णय त्याच्या स्वतःच्या अभ्यासावर आधारित असतो. आपण गुंतवणूक केलेल्या प्रत्येक शेअरमधून आपल्याला फायदाच मिळेल, असा त्याचा अट्टाहास नसतो. मात्र शेअर बाजारातील आपल्या एकूण गुंतवणुकीवरील परतावा हा महागाईच्या दरापेक्षा अधिक असेल, याची खात्री तो करत असतो. त्याच्या पोर्टफोलिओमधील शेअर आणि म्युच्युअल फंडांची संख्या मर्यादित असते. बाजारात येणाऱ्या ‘आयपीओं’चा तो स्वतः अभ्यास करतो आणि निवडक ‘आयपीओं’नाच अर्ज करतो. नवा म्युच्युअल फंड जर नावीन्यपूर्ण असेल, तरच तो त्यात गुंतवणूक करतो.

शेअर बाजारात सर्व गुंतवणूकदारांना खरेदी-विक्रीसाठी समान संधी असते. शेअर बाजारातील कंपन्यांची माहिती देखील सर्वांना एकसारखीच मिळत असते. मात्र, प्रत्येक गुंतवणूकदाराला त्याच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा मात्र वेगवेगळा असतो. याचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येकाची वेगेवेगळी मानसिकता! आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून संतुलित गुंतवणूकदार होण्याकडे आपली वाटचाल सुरु ठेवावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com