तीन वर्षांनंतरही नोटबंदीची धग कायम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

देशात नोटबंदीला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असताना औद्योगिक क्षेत्र मात्र या धक्‍क्‍यातून अद्यापही सावरलेले नाही. नोटबंदीपाठोपाठ वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणीवेळी चाचपडणाऱ्या उद्योजकांना मंदीच्या प्रभावाने चांगलेच बेजार केले आहे. 

मुंबई : डिजिटल व्यवहारांऐवजी रोकड व्यवहारांमध्ये झालेली वाढ आणि चलनात बनावट नोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेसमोर नवे संकट उभे केले आहे. देशात नोटबंदीला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असताना औद्योगिक क्षेत्र मात्र या धक्‍क्‍यातून अद्यापही सावरलेले नाही. नोटबंदीपाठोपाठ वस्तू आणि सेवा कर अंमलबजावणीवेळी चाचपडणाऱ्या उद्योजकांना मंदीच्या प्रभावाने चांगलेच बेजार केले आहे. 

तीन वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली होती. देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला; मात्र या निर्णयाने रोख व्यवहारांवर अवलंबून असलेल्या असंघटित क्षेत्रातील व्यावसायांना मोठा फटका बसला. स्थावर मालमत्ता क्षेत्रातील गुंतवणूक रोडावली. सराफ व्यवसायाला फटका बसला. 

नोटबंदीच्या काळात जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या 99 टक्‍क्‍यांहून अधिक नोटा रिझर्व्ह बॅंकेला प्राप्त झाल्याने काळा पैसा शोधण्याच्या मोहिमेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले. दरम्यान, तीन वर्षांत डिजिटल व्यवहारांमध्ये फारशी वाढ झाली नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार चलनात तब्बल 21.37 लाख कोटींच्या नोटा आहेत. रोख व्यवहारांचे प्रमाण वाढत असल्याने चलनी नोटांचे वितरणही वाढले आहे. हे प्रमाण नोटबंदी जाहीर होण्यापूर्वीपेक्षा तब्बल चार लाख कोटींनी जास्त आहे. रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या चलनी नोटेची छपाई बंद केली असली, तरी चलनातील एकूण वितरणापैकी उच्च मूल्याच्या नोटांचे प्रमाण 83 टक्के आहे. गेल्या तीन वर्षांत बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण टप्प्याटप्याने वाढले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या आकडेवारीनुसार, 2018-19 या वर्षात दोन कोटी 19 लाख रुपये मूल्याच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. 
--- 
ठोस उपाययोजनांची गरज 
नोटाबंदीचा सर्वाधिक फटका बसलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसेच असंघटित क्षेत्रातील व्यावसायिकांचा अद्याप संघर्ष सुरू आहे. नोटबंदीनंतर या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली. नोटबंदीतून काळा पैसा शोधून काढण्यास अपयश आले असताना डिजिटल व्यवहारांकडे ग्राहकांनी फिरवलेली पाठ सरकारची चिंता वाढवणारी आहे. यासाठी ठोस आणि प्रभावी उपाययोजना सरकारला कराव्या लागतील, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: effects of demonetisation remains after three years