पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)  पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफ खातेधारकांना आपल्या पीएफ निधीवर अधिक परतावा मिळविण्यासाठी ईपीएफओने नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली: कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ)  पीएफ खातेधारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पीएफ खातेधारकांना आपल्या पीएफ निधीवर अधिक परतावा मिळविण्यासाठी ईपीएफओने नवीन पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, ईपीएफओ लवकरच कर्मचाऱ्याच्या पीएफ निधीतील ठराविक हिस्सा  एक्स्चेंज ट्रेडेड फंड म्हणजे ईटीएएफद्वारे शेअर बाजारात गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या विचारात आहे.

पीएफधारक आपल्या खात्यातील रक्कम ईटीएएफच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो. परिणामी त्याला बाजारातून अधिक परतावा मिळू शकणार आहे. नुकत्याच झालेल्या  ईपीएफओच्या सर्वोच्च मंडळाच्या बैठकीत शेअर बाजारातून मिळणाऱ्या अधिक परताव्याची शक्यता बघून पीएफधारकांना पर्याय उपलब्ध करून देण्याबाबत विचार सुरु आहे. पीएफधारक ईटीएएफमधील गुंतवणूक वाढवू किंवा कमी देखील करू शकणार आहे. आतापर्यंत असा कोणत्याही प्रकारचा पर्याय पीएफधारकांना उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. 

ईपीएफओने गेल्यावर्षी शेअर बाजारात गुंतविलेल्या निधीतील ईटीएफ युनिट्स ईपीएफ खात्यांमध्ये चालू महिन्यात (एप्रिल) जमा करण्याची देखील योजना आहे. 

शेअर बाजारातून मिळणार फायदा: 
सध्या ईपीएफओच्या सर्वोच्च मंडळाने ईटीएएफमधील गुंतवणूक करण्याची मर्यादा 15 टक्‍क्‍यांवर आणली आहे. भांडवली बाजारात "ईपीएफओ'ने मार्चअखेरीस 21 हजार 589 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एकूण निधीच्या 10 टक्के गुंतवणूक "ईपीएफओ'ने केली. तिचे बाजारमूल्य आता 23 हजार 845 कोटी रुपयांवर पोचले आहे. म्हणजे शेअर बाजारात गुंतवलेल्या निधीत चांगली वाढ झाली आहे. 

Web Title: EPFO exploring option to allow subscribers to change limit in ETF