विश्‍वास गमविल्यानेच मिस्त्रींची हकालपट्टी : रतन टाटा

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

टाटा खरे बोलत नाहीत : मिस्त्री
सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या आरोपांना उत्तर देताना टाटा खरे बोलत नसल्याचा प्रत्यारोप केला. टाटा सोयीस्कररीत्या चुकीची माहिती देत असल्याचे मिस्त्री यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. टाटा यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीसंदर्भात एकही सबळ पुरावा सादर केलेला नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.

मुंबई: विविध कंपन्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता व विश्‍वस्त मंडळाचा विश्‍वास गमाविल्याने सायरस मिस्त्री यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचे "टाटा' समूहाचे अंतरिम अध्यक्ष रतन टाटा यांनी सांगितले.

रतन टाटा यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीचे समर्थन करणारे पत्र भागधारकांना लिहिले. टाटा सन्सच्या विश्‍वस्त मंडळासोबतचे मिस्त्रींचे संबंध सातत्याने खालावत होते. तसेच मिस्त्रींचे काही निर्णय दुर्लक्ष करण्यासारखे नव्हते. म्हणूनच मिस्त्रींच्या हकालपट्टीची कारवाईही हेतुपुरस्सर करण्यात आली, असेही टाटा यांनी पत्रात नमूद केले आहे. टाटा सन्सचे अध्यक्ष असल्यामुळेच मिस्त्री समूहातील संचालक मंडळावर नियुक्ती झाल्याचे टाटा यांनी सांगितले.

"मिस्त्री यांनी राजीनामा देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांनी अद्याप तो दिलेला नाही. त्यांचा संचालक मंडळामधील वावर हा कंपन्यांमध्ये गंभीररीत्या फूट पाडणारा ठरू शकतो. जो की कंपन्यांना अकार्यक्षम बनवू शकतो,'' असेही टाटा यांनी पत्रात सांगितले आहे. मिस्त्री यांना स्वत:हून राजीनामा देण्याची संधी देण्यात आली होती; मात्र त्यांनी ती फेटाळल्याचेही टाटा यांनी नमूद केले आहे.

टाटा खरे बोलत नाहीत : मिस्त्री
सायरस मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या आरोपांना उत्तर देताना टाटा खरे बोलत नसल्याचा प्रत्यारोप केला. टाटा सोयीस्कररीत्या चुकीची माहिती देत असल्याचे मिस्त्री यांनी भागधारकांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. टाटा यांनी मिस्त्री यांच्या हकालपट्टीसंदर्भात एकही सबळ पुरावा सादर केलेला नसल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: Faith loss mistri expulsion: Ratan Tata