गेल्या दोन वर्षांचे 'टॅक्‍स रिटर्न' भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 मार्च 2018

जर तुम्ही 2016-17 या आर्थिक वर्षांसाठीचे प्राप्तिकर विवरण पत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरले नसेल तर त्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपली आहे. 31 मार्च 2018 प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख आहे.

मुंबई : जर तुम्ही 2016-17 या आर्थिक वर्षांसाठीचे प्राप्तिकर विवरण पत्र (इन्कम टॅक्‍स रिटर्न) भरले नसेल तर त्याची अंतिम तारीख जवळ येऊन ठेपली आहे. 31 मार्च 2018 प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख आहे. 2016-17 या आर्थिक वर्षासाठी म्हणजेच 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या दरम्यान मिळवलेल्या उत्पन्नासाठी 31 मार्च 2018 पर्यत प्राप्तिकर विवरण पत्र भरायचे आहे.  त्याचबरोबर 2015-16 या आर्थिक वर्षासाठीचे ज्यांचे प्राप्तिकर विवरण पत्र भरायचे राहून गेले आहे त्यांच्यासाठीसुद्धा 31 मार्च हीच अंतिम तारीख आहे. प्राप्तिकर विभागाने दिवसेंदिवस अतिशय काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरवात केली आहे. 

प्राप्तिकर विभागाचे कडक धोरण

निर्धारित वेळेत प्राप्तिकराची वसुली, जर प्राप्तिकर वेळेत भरला नाही तर नोटीस, दंड अशा स्वरूपातील कायदेशीर कारवाई करत प्राप्तिकर विभागाने कडक धोरण अवलंबले आहे. अंतिम मुदतीत प्राप्तिकर विवरण पत्र न भरलेल्यासाठी प्राप्तिकर विभागाने कलम 139 (4) मध्ये सुधारणा करत 'फायनान्स अॅक्ट 2016' अंमलात आणला आहे. याद्वारे अंतिम मुदतीत प्राप्तिकर विवरण पत्र न भरलेल्यांना वाढीव मुदतीत त्याचा भरणा करता येणार आहे. उदाहरणार्थ 2016-17 या आर्थिक वर्षांसाठी प्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2017 होती. आता ज्यांनी त्या मुदतीत प्राप्तिकर विवरण पत्र भरले नाही त्यांच्यासाठी 31 मार्च 2018 ही शेवटची तारीख असणार आहे. मात्र 31 मार्च 2018 पर्यंत प्राप्तिकर विवरणपत्र न भरल्यास प्राप्तिकर विभागाकडून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. वेळेवर प्राप्तिकर विवरणपत्र सादर करावे यासाठी प्राप्तिकर विभाग यासंबंधीची जनजागृती वेगवेगळ्या माध्यमातून आणि जाहिरातींमधून करत असते. 

Web Title: File your I-T return for past two financial years by March 31