'इन्फोसिस' 13 हजार कोटींचे शेअर बायबॅक करणार

वृत्तसंस्था
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

कंपनी स्वतःचेच शेअर खरेदीदारांकडून खरेदी करते, तेव्हा त्या पद्धतीला शेअर बायबॅक म्हणतात. इन्फोसिस सध्या 4.9 टक्के इतके म्हणजे 13 हजार कोटी रूपये किमतीचे शेअर बायबॅक करणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर विकायचे आहेत, ते कंपनीला विकू शकतात.

मुंबई : इन्फोसिसच्या संचालक मंडळाने आज (शनिवार) तब्बल 13 हजार कोटी रूपयांचे समभाग 'बायबॅक' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजिनाम्यानंतर तातडीने कंपनीने हा निर्णय घेतला.

कंपनीच्या संचालक मंडळाने शुक्रवारीच यासंदर्भात निवेदन जारी केले होते. सिक्का यांना मंडळाने पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना संस्थापक नारायण मूर्ती यांच्यावर ठपका ठेवला होता. त्यांच्या चुकीच्या मोहिमेमुळे सिक्का यांना जावे लागल्याचे संचालक मंडळाने म्हटले होते.

शेअर बायबॅक म्हणजे काय?
कंपनी स्वतःचेच शेअर खरेदीदारांकडून खरेदी करते, तेव्हा त्या पद्धतीला शेअर बायबॅक म्हणतात. इन्फोसिस सध्या 4.9 टक्के इतके म्हणजे 13 हजार कोटी रूपये किमतीचे शेअर बायबॅक करणार आहे. ज्या गुंतवणूकदारांना शेअर विकायचे आहेत, ते कंपनीला विकू शकतात.

गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल?
शेअर बायबॅक पद्धतीमुळे सर्वसाधारपणे प्रती शेअर प्राप्ती वाढते. अधिकची रोकड शेअरधारकांकडे हस्तांतरीत होते. बाजारपेठेत फारसा उठाव नसतानाही शेअरचे मुल्य टिकून राहण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. इन्फोसिसच्या पहिल्याच बायबॅकमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान टळेल, असे अपेक्षित आहे. शुक्रवारी सिक्का यांच्या राजिनाम्यानंतर शेअरचा भाव दहा टक्क्यांनी ढासळला होता. शुक्रवारी बाजार बंद होताना शेअरचा भाव 923.10 रूपये इतका होता. कंपनीने बायबॅकसाठी 1,150 रूपये प्रती शेअर असा दर घोषित केला आहे.

बायबॅक कशासाठी?
इन्फोसिसच्या संस्थापक आणि संचालक मंडळात सध्या वाद सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शेअर बायबॅक करण्याची मागणी काही माजी संचालकांनी केली होती. कंपनीच्या कार्पोरेट गव्हर्नन्समधील काही उणिवांची सार्वजनिक चर्चा झाल्याने कंपनीच्या प्रतिमेची हानी होण्याची शक्यता होती. त्यामुळे कंपनीने बायबॅकचा निर्णय घेतला.

यापूर्वीचे शेअर बायबॅक कोणते?
टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस (टीसीएस) या इन्फोसिसच्या सर्वात प्रबळ प्रतिस्पर्धी कंपनीने यावर्षीच्या एप्रिलमध्ये 16 हजार कोटी रूपयांचे शेअर बायबॅक केले. त्या आधी फेब्रुवारी 2012 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिजने 10, 440 कोटी रूपयांचे शेअर बायबॅक करायचे घोषित केले होते. प्रत्यक्षात रिलायन्सने 3,900 कोटी रूपयांचे शेअर बायबॅक केले. रिलायन्सच्या एकूण योजनेच्या केवळ 38 टक्के शेअर बायबॅक करूनही कंपनीच्या शेअरचा भाव तेव्हा 8 टक्क्यांनी वधारला होता. यावर्षी जुलैमध्ये विप्रो कंपनीने 11,000 कोटी रूपयांचे शेअर बायबॅक केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Finance news in Marathi Infosys buyback offer of Rs 13000 crore