भारताच्या परकी गंगाजळीत घसरण 

वृत्तसंस्था
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात घसरण झाली आहे

नवी दिल्ली: भारताच्या परकी गंगाजळीत या आठवड्यात 69.7 कोटी डॉलरची घसरण झाली आहे. परकी चलनसाठा आता 428.952 अब्ज डॉलर इतका झाला आहे. रिझर्व बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती समोर आली आहे. मागील आठवड्यात परकी चलनसाठा 72.27 कोटी डॉलरने वाढून 429.649 अब्ज डॉलरवर पोचला होता. मागील काही आठवड्यांमध्ये सातत्याने परकी चलन साठ्यात घसरण होत होती.  

एप्रिल 2018 मध्ये परकी चलनाचा साठा विक्रमी पातळीवर म्हणजे 426.028 अब्ज डॉलरवर पोचला होता. भारताच्या परकी चलनसाठ्याने पहिल्यांदाच 400 अब्ज डॉलरची पातळी ओलांडली होती. परंतू त्यानंतर मात्र त्यात सातत्याने चढ उतार होत आहेत.

परकी गंगाजळीमध्ये महत्वाच्या देशांच्या चलनाच्या साठ्याचा महत्वाचा हिस्सा असतो. यात अमेरिकी डॉलर हा महत्वाचा घटक असतो. अमेरिकेच्या चलना व्यतिरिक्त युरो, पौंड आणि येनचासुद्धा समावेश भारताच्या परकी चलनाच्या साठ्यात असतो. हा साठा 63.3 कोटी डॉलरने घटून तो 398.724 अब्ज डॉलरवर पोचला आहे.  याशिवाय आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे सोन्याचा साठा. या आठवड्यात सोन्याच्या साठ्यात 16.64 कोटी डॉलरने घट होत तो 25.163 अब्ज डॉलरवर स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसोबत असलेले विशेष रेखांकन हक्कांमध्ये 95 लाख डॉलरची घट होत ते 1.434 अब्ज डॉलरवर पोचले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Forex reserves decline by $697 million due to fall in currency assets