अर्थव्यवस्थेची तीन चाके ‘पंक्‍चर’

अर्थव्यवस्थेची तीन चाके ‘पंक्‍चर’

नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेची चारपैकी तीन चाके ‘पंक्‍चर’ झाल्याची टीका माजी अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काल केली. पेट्रोल-डिझेल जीएसटी करप्रणालीत समाविष्ट केल्यास त्यांच्या किमती तत्काळ कमी होतील, असेही त्यांनी म्हटले. परागंदा नीरव मोदी व मेहुल चोक्‍सी यांना भारतात परत आणण्याबाबत मोदी सरकार कितपत गंभीर आहे, याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली.

काँग्रेस कार्यालयातील पत्रकार वार्तालापात चिदंबरम यांनी त्यांच्या उपरोधिक भाषेत सरकारच्या आर्थिक आघाडीवरील अपयशावर चौफेर टीका केली. निर्यात, खासगी गुंतवणूक, सरकारी खर्च आणि खासगी खप (पब्लिक कन्झंप्शन) या चार चाकांवर अर्थव्यवस्था चालते व यातील सरकारी खर्च वगळता बाकीची तीन चाके ‘पंक्‍चर’ झाल्याचे सांगून ते म्हणाले, की निर्यात नकारात्मक, खासगी गुंतवणूक थंडावलेली आणि खासगी म्हणजेच लोकांकडून होणारी खरेदी मंदावलेली आहे.

रोजगाराच्या आघाडीवर निराशाजनक चित्र असून, बेकारी वाढत आहे. लेबर ब्यूरोवगळता रोजगाराबाबत अन्य कोणतीही विश्‍वासार्ह आकडेवारी उपलब्ध नाही, असे सांगून लेबर ब्यूरोचा ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०१७चा अहवाल प्रकाशित न करण्याबद्दलही चिदंबरम यांनी विचारणा केली. 

पंतप्रधानांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी
पंतप्रधानांच्या हत्येच्या कटासंदर्भात संशयित माओवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या कथित पत्राबद्दल बोलताना चिदंबरम म्हणाले, की अटक केलेल्या व्यक्तींचा काँग्रेसशी संबंध नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. त्यांच्याकडे मिळालेले पत्र जणू काही अधिकृत पत्र आहे, असे समजण्याचे कारण नाही. अशी पत्रे फिरत असतात. पंतप्रधानांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे आणि ती सरकारने काटेकोरपणे पाळली पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com