esakal | 'फ्रॅंकलिन'कडून सहा डेट फंड योजना बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

Franklin

कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्य परिस्थितीत, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेत असल्याचा दबाव फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंड कंपनीवर येत होता.

'फ्रॅंकलिन'कडून सहा डेट फंड योजना बंद 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई - कोरोना विषाणूच्या महामारीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्याचा विपरित परिणाम देशातील वित्तीय व्यवस्थेतील चलन तरलतेवर देखील होतो आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात जुन्या म्युच्युअल फंड कंपन्यांपैकी एक असलेल्या "फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडा'ने स्वेच्छेनेच सहा डेट प्रकारातील योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय 23 एप्रिल 2020 पासून लागू होणार आहे. फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांची 30 हजार 800 कोटी रुपयांची गुंतवणूक अडकली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या सद्य परिस्थितीत, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक काढून घेत असल्याचा दबाव फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंड कंपनीवर येत होता. शिवाय रोखे बाजारमध्ये (बॉण्ड मार्केट) असलेल्या चलन तरलतेच्या अभावाचाही मोठा दबाव कंपनीवर होता. या पार्श्वभूमीवर फ्रॅंकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाने डेट फंड योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. बंद केलेल्या सहा योजनांचा हिस्सा म्युच्युअल फंड उद्योगात 1.4 टक्के आहे, असा दावा असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स ऑफ इंडियाने केला आहे. त्यामुळे त्याची मोठी झळ बसणार नाही, असेही म्हटले आहे. 

बंद केलेल्या योजना: 

1)फ्रॅंकलिन इंडिया लो ड्युरेशन फंड, 
2)फ्रॅंकलिन इंडिया डायनामिक ऍक्‍च्युअल फंड, 
3)फ्रॅंकलिन इंडिया क्रेडिट रिस्क फंड, 
4)फ्रॅंकलिन इंडिया शॉर्ट टर्म इन्कम प्लॅन, 
5)फ्रॅंकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बॉंड फंड, 
6) फ्रॅंकलिन इंडिया इन्कम ऑपर्च्युनिटीज फंड 

गुंतवणूकदारांवर बंधने: 

या योजना बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांना यातून गुंतवणूक काढता येणार नाही, नवी गुंतवणूक करता येणार नाही, या योजनांमधील गुंतवणूक इक्विटी प्रकारातील योजनांमध्ये ट्रान्सफर करता येणार नाही किंवा सिस्टेमॅटीक विथड्रावल्सद्वारे (एसडब्ल्यूपी) नियमित गुंतवणूक काढता येणार नाही. 

सिक्‍युरिटीज एक्‍सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) डेट प्रकारातील योजनांच्या मूल्यांकन धोरणात थोडी शिथिलता आणली आहे. कोरोनाच्या संकटामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जे बॉंड किंवा कमर्शिअल पेपर नियोजित वेळेत व्याज देऊ शकणार नाहीत किंवा जे मॅच्युरिटीचा अवधी वाढवतील त्यांना डेट म्युच्युअल फंडांनी डिफॉल्ट म्हणून घोषीत करू नये, असे सेबीने सांगितले आहे.