सहाराच्या 'ऍम्बी व्हॅली'ला प्राप्तिकर विभागाची नोटीस 

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सहारा समूहाची मालकी असलेल्या "ऍम्बी व्हॅली' या सुमारे 34 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता.

नवी दिल्ली - एकीकडे गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास अपयशी ठरणाऱ्या सहारा समूहाला आणखी एक धक्का बसला आहे. प्राप्तिकर विभागाने "ऍम्बी व्हॅली' प्रकल्पासाठी 24,646 कोटी रुपये कर आणि दंडाची मागणी केली आहे. प्रथमच एखाद्या कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणात कर आकारण्यात आला आहे. 

आर्थिक वर्ष 2012-13 मध्ये ऍम्बी व्हॅलीला 48,000 कोटी रुपये मिळाल्याचे प्राप्तिकर विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. यासंबंधी विभागाने 24 जानेवारी, 2017 रोजी ही नोटीस समुहाला पाठवली होती, तसेच तातडीने कर भरण्याची मागणी केली होती. चार वर्षांच्या चौकशीअंती प्राप्तिकर विभागाने हा कर ठोठावला आहे. ऍम्बी व्हॅलीला या कालावधीत भरघोस उत्पन्न मिळूनदेखील कंपनीने ताळेबंदात खोटी आकडेवारी सादर केल्याचे प्राप्तिकर विभागाला आढळून आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी सहारा समूहाची मालकी असलेल्या "ऍम्बी व्हॅली' या सुमारे 34 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाने अनेक वेळा बजावूनदेखील सहारा समूहाने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नव्हते. समुहाला "सेबी-सहारा रिफंड खात्या'मध्ये पाच हजार कोटी रुपये भरण्यास अपयश आल्याने हा निर्णय दिला. हे पैसे भरण्यास आणखी वेळ वाढवून देण्यास न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला होता. सहारा समूहाच्या प्रवक्‍त्याने या वृत्ताला दुजोरा दिला. 

Web Title: Fresh trouble for Sahara: Aamby Valley gets Rs 24,647 cr I-T notice, biggest tax penalty on any corporate