इंधन दरवाढीने महागाईचा भडका

पीटीआय
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. 

नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्‍क्‍यांवर पोचली. घाऊक चलनवाढीची ही मागील चार महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. 

घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक चलनवाढ मोजली जाते. सप्टेंबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.१३ टक्के होती. गेल्या वर्षी ऑक्‍टोबर महिन्यात ती ३.६८ टक्के होती. सरकारने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अन्नपदार्थांच्या भावात ऑक्‍टोबरमध्ये १.४९ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये अन्नपदार्थांचे भाव ०.२१ टक्के घसरले होते. याचबरोबर ऑक्‍टोबरमध्ये भाज्यांच्या भावात १८.६५ टक्के घसरण झाली असून, मागील महिन्यात ती ३.८३ टक्के होती. इंधन आणि ऊर्जा दरवाढ ऑक्‍टोबरमध्ये १८.४४ टक्के आहे. यामध्ये पेट्रोलच्या दरातील वाढ १९.८५ टक्के आणि डिझेलच्या दरातील वाढ २३.९१ टक्के आहे. याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ ३१.२९ टक्के आहे. 

बटाट्याच्या भावात ऑक्‍टोबरमध्ये ९३.६५ टक्के वाढ झाली आहे. याचवेळी कांद्याच्या भावात ३१.६९ टक्के आणि डाळींच्या भावात १३.९२ टक्के घट झाली आहे. ऑक्‍टोबरमध्ये घाऊक चलनवाढ ५.२८ टक्के या चार महिन्यांतील उच्चांकी पातळीवर पोचली आहे. याआधी जूनमध्ये ती ५.६८ टक्‍क्‍यांवर पोचली होती.

किरकोळ, घाऊकचे विरोधाभासी चित्र 
सरकारने या आठवड्याच्या सुरवातीला किरकोळ चलनवाढीची आकडेवारी जाहीर केली होती. ऑक्‍टोबरमध्ये किरकोळ चलनवाढ ३.३१ टक्के या वर्षभरातील नीचांकी पातळीवर घसरली. किरकोळ चलनवाढीत घसरण झालेली असताना घाऊक चलनवाढीत वाढ नोंदविण्यात आली आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरांचा आढावा घेताना प्रामुख्याने किरकोळ चलनवाढीचा विचार केला जातो. ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीसाठी किरकोळ चलनवाढ ३.९ ते ४.५ टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असा अंदाज रिझर्व्ह बॅंकेकडून वर्तविण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fuel Rate Dearness