काही तासांत मिळणार 'ईपीएफ'

वृत्तसंस्था
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

"ईपीएफओ'ची देशातील सर्व कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. "ईपीएफ' आणि निवृत्तिवेतनाबाबतचे सर्व अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याची सुविधा मे महिन्यात सुरू होणार आहे.
- व्ही. पी. जॉय, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सदस्यांना मे महिन्यापासून ऑनलाइन "ईपीएफ' काढता येणार आहे. तसेच, निवृत्तिवेतनही निश्‍चित करता येणार असून, कागदोपत्री प्रक्रियेमुळे यासाठी लागणारा विलंब ऑनलाइन प्रक्रियेमुळे कमी होणार आहे.

सध्या "ईपीएफओ'कडे 1 कोटीपर्यंत अर्ज येतात. यात ईपीएफ काढणे, तडजोड करणे, निवृत्तिवेतन निश्‍चिती आणि मृत व्यक्तीच्या समूह विम्याचा लाभ या बाबींचा समावेश असतो. ही प्रक्रिया ऑनलाइन करण्यासाठी "ईपीएफओ'ची देशभरातील कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्यानंतर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरवात होणार आहे. एखाद्याने अर्ज केल्यानंतर काही तासांत त्याचा "ईपीएफ' देण्याची महत्त्वाकांक्षी योजना "ईपीएफओ'ने आखली आहे. यामुळे एखाद्याला तीन तासांमध्ये "ईपीएफ' मिळू शकेल.
"ईपीएफओ'ने कर्मचाऱ्याने अर्ज केल्यानंतर 20 दिवसांत "ईपीएफ' अथवा निवृत्तिवेतन देणे गरजेचे आहे. सध्या "ईपीएफओ'ने 50 क्षेत्रीय कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडली आहेत. नुकत्याच झालेल्या "ईपीएफओ'च्या बैठकीत डिजिटायजेशनवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार "ईपीएफओ'ची देशातील 125 कार्यालये मध्यवर्ती सर्व्हरशी जोडली जात आहेत.

आधार जोडणीसाठी 31 मार्चची मुदत
"ईपीएफ' खात्याशी आधार क्रमांक जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे "ईपीएफ' खाते, निवृत्तिवेतन खाते, बॅंक खाते आणि आधार क्रमांक जोडले जाऊन ऑनलाइन सुविधा देणे सोपे होणार आहे. आधार जोडणी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची अखेरची मुदत देण्यात आली आहे.

Web Title: get epf in few hours