विद्युत उपकरणांवरील 'जीएसटी' कमी करा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राची सध्या 5 ते 6 टक्के दराने वाढ होते आहे. गेल्यावर्षी झालेल्या नोटाबंदी आणि जीएसटी या नवीन करप्रणालीमुळे विकासदर किंचित कमी झाला आहे. मात्र 'मेक इन इंडिया' आणि भारत सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत जलदगतीने सकारात्मक बदल होत आहेत.

पुणे: येत्या अर्थसंकल्पात विद्युत उपकरणांवरील वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) 28 टक्क्यांवरून 18 किंवा 12 टक्क्यांवर आणला  पाहिजे. जेणेकरून विद्युत उपकरण (स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स) निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांना ग्राहकांकडे फायदा परवर्तीत करता येणे शक्य होईल, असे गोदरेज अॅप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले. ते पुण्यात गोदरेजच्या नवीन 'एज ड्यूओ' रेफ्रिजरेटरच्या लॉन्चिंगप्रसंगी पत्रकारांशी बोलत होते. 

विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राची सध्या 5 ते 6 टक्के दराने वाढ होते आहे. गेल्यावर्षी झालेल्या नोटाबंदी आणि जीएसटी या नवीन करप्रणालीमुळे विकासदर किंचित कमी झाला आहे. मात्र 'मेक इन इंडिया' आणि भारत सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत जलदगतीने सकारात्मक बदल होत आहेत. याकाळात गोदरेज अॅप्लायन्सेसची वाटचाल 15 टक्के दराने सुरू होती. भारतीय कंपनी असलेली गोदरेज अॅप्लायन्सेसने कायमच भारतीय लोकांच्या गरजा समजून भारतीयांसाठी खास उपकरणांशी निर्मिती करते, असेही नंदी यावेळी म्हणाले.  

कंपनीने पुण्यातील शिरवळमध्ये प्रकल्प उभारला असून त्यासाठी 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पातून 2019 पासून उत्पादन सुरु होणार आहे. दरम्यान कंपनी 'प्रीमियम' श्रेणीतील उपकरणांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. मार्च 2018 अखेर कंपनीला 4000 कोटी रुपयांच्या उलाढालीची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी कंपनीने 3,300 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

Web Title: Godrej eyes smart appliances space