सोन्याला वाढती झळाळी!

पीटीआय
Monday, 23 December 2019

आंतरराष्ट्रीय पातळीवर वधारलेले भाव आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात झालेली घसरण यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोमवारी सोन्याची झळाळी वाढली. याचबरोबर चांदीच्या भावातही आज वाढ नोंदविण्यात आली. 
 

नवी दिल्ली/मुंबई : नाताळच्या सुट्यांच्या पार्श्‍वभूमीवर भांडवली बाजारांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेमुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे मोर्चा वळविला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. सोन्याचा भाव वधारून प्रतिऔंस 1 हजार 484 डॉलरवर गेला. याचवेळी चांदीचा भावही प्रतिऔंस 17.36 डॉलरवर पोचला. दिल्लीतील सराफा बाजारपेठेत आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 187 रुपयांची वाढ होऊन 39 हजार 53 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 495 रुपयांनी वाढून 46 हजार 499 रुपयांवर गेला. 

मुंबईतही भाव तेजीत 
मुंबईतील सराफा बाजारपेठेतही आज सोने आणि चांदीच्या भावात तेजी दिसून आली. सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 160 रुपयांनी वधारून 38 हजार 281 रुपयांवर गेला. याचवेळी चांदीच्या भावात तब्बल 785 रुपयांची वाढ होऊन तो 45 हजार 35 रुपयांवर पोचला. 

डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला 
देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण आणि खनिज तेलाच्या भावात सुरू असलेली वाढ यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 6 पैशांची घसरण होऊन 71.18 या पातळीवर बंद झाला. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांचाही आज रुपयाला फटका बसला. जगभरातील प्रमुख चलनांच्या तुलनेत आज डॉलर वधारल्याचा परिणाम चलन बाजारावर झाला. देशांर्तगत शेअर बाजारात आज घसरण झाली. याचबरोबर जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या भावातील वाढ कायम आहे. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण झाली. या आठवड्यात अर्थव्यवस्थेबाबत महत्वाची आकडेवारी जाहीर होणार नसल्याने चलन बाजारात फारशी अस्थिरता दिसून येणार नाही. मात्र, नाताळच्या सुट्यांमुळे या आठवड्यात बाजारही कमीच दिवस सुरू असेल, अशी माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे विश्‍लेषक गौरांग सोमय्या यांनी दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gold and silver prices soar again