मुंबई : नव्या किचकट नियमांच्या सक्तीविरोधात (rules restrictions) देशातील हॉलमार्किंग (Gold hallmarking) केंद्र चालक-मालकांनी येत्या मंगळवारी (ता. 28) एक दिवसाचा लाक्षणिक बंद पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. सोने दुकानदारांना (Gold) हॉलमार्किंग केंद्रे उघडू देऊ नयेत तसेच नवे नियम करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी, असे या केंद्रचालकांच्या समितीचे म्हणणे आहे.
सरकारच्या नव्या नियमांनुसार, जिथे दागिने घडवले जातात तेथेच त्यावर हॉलमार्किंग करणे जरुरी आहे. त्यामुळे दागिने करणाऱ्या कारखान्यांबाहेरील हॉलमार्किंग केंद्राला कामच उरणार नाही, असे हॉलमार्किंग अॅक्शन कमिटीच्या सदस्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही केंद्रे आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तसेच सोन्याचे दागिने तयार करून ते सोने दुकानदारांना विकणारे उत्पादक किंवा घाऊक व्यापारी यांच्यावर आता हॉलमार्किंगची जबाबदारी आली आहे. त्यामुळे यासंदर्भातील तक्रारींची तड लावण्याचा कोणताही मार्ग ग्राहकांना राहणार नाही. तसेच सोने दुकानदारांवरही दागिन्यांच्या गुणवत्तेबाबत काहीही जबाबदारी पडणार नाही, असेही इंडियन असोसिएशन ऑफ हॉलमार्किंग सेंटर चे अध्यक्ष उदय शिंदे यांनी सकाळ ला सांगितले.
आता सोने व्यावसायिकांना दागिन्यांच्या हॉलमार्किंगसह त्यावर हॉलमार्किंग युनिक आयडी क्रमांक (एचयूआयडी) टाकणे बंधनकारक झाले आहे. हॉलमार्किंगसाठी मिळणारे पैसे कमी आहेत तर दुसरीकडे त्याच्या यंत्रसामुग्रीसाठी आणि मनुष्यबळासाठी मोठी गुंतवणुक करावी लागते. हे व्याप करून दागिने देण्यासही वेळ लागत आहे. त्यामुळे हॉलमार्किंग व एचयूआयडी साठी मिळणारी रक्कम वाढवावी असेही शिंदे म्हणाले.
त्यातच आता दागिन्यांवर हॉलमार्किंग सक्तीचे झाल्याने अनेक सोने दुकानदारांनी वेगळ्या नावाने हॉलमार्किंग केंद्रे उघडली आहेत. मात्र ग्राहकांना अस्सल सोने मिळावे म्हणून सरकारने हॉलमार्किंग सक्तीचे केले आहे. हॉलमार्किंग केंद्रे ही ग्राहक आणि सोने व्यावसायिक यांच्यात त्रयस्थ हमीदार म्हणून काम करतील असे अपेक्षित आहे. त्यामुळे सोने दुकानदारच असे त्रयस्थाचे हॉलमार्किंगचे काम करू लागले तर चालणारच नाही. त्यामुळे सरकारने या गोष्टीचीही नोंद घेऊन दागिने वा सोन्याशी संबंधित कोणालाही हॉलमार्किंग केंद्र उघडू देऊ नये, असेही शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.