लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात  तेजी 

पीटीआय
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

लग्नसराईमुळे सोन्याला मागणी वाढल्याने भावात बुधवारी वाढ नोंदविण्यात आली. जागतिक पातळीवर भावात तेजी निर्माण झाल्यामुळेही सोन्याची झळाळी आज आणखी वाढली. 

अमेरिका - चीन यांच्यातील व्यापार कराराबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुरेशी स्पष्टता दर्शविलेली नाही. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये अनिश्‍चतेतेचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असलेल्या सोन्याकडे वळत आहेत. जागतिक पातळीवर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली. सोन्याचा भाव प्रतिऔंस 1 हजार 461 डॉलरवर गेला तर, चांदीचा भाव प्रतिऔंस 16.90 डॉलरवर गेला, अशी माहिती एचडीएफसी सिक्‍युरिटीजचे वरिष्ठ विश्‍लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी दिली. 

दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 225 रुपयांनी वधारून 38 हजार 715 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 440 रुपयांची वाढ होऊन 45 हजार 480 रुपयांवर गेला. जागतिक पातळीवर झालेली भाववाढ आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या भावात आज तेजी दिसून आली. 

मुंबईतही भाव वधारले 
मुंबईतील सराफा बाजारात आज सोने, चांदीच्या भावात वाढ झाली. शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 236 रुपयांनी वधारून 38 हजार 363 रुपयांवर गेला. स्टॅंडर्ड सोन्याचा भावही 235 रुपयांनी वधारून 38 हजार 209 रुपयांवर गेला. चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 395 रुपयांची वाढ होऊन 44 हजार 675 रुपयांवर पोचला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold jumps Rs 225 on wedding season demand