दिवाळीच्या तोंडावर सोन्याची ‘चांदी’!

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

मुंबई - अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या शेअर बाजारांमधील अस्थिरता, खनिज तेलाची दरवाढ, अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकमेव विश्‍वासात्मक आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने आपलेसे केले आहे. परिणामी, जागतिक बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटत असून लवकरच सोने ३५ हजारांवर जाईल, असा अंदाज सराफांना आहे.

मुंबई सराफा बाजारात शुक्रवारी (ता. २७) सोन्याचा दर सहा वर्षांच्या उच्चांकावर पोहचला. शुद्ध सोने प्रति १० ग्रॅमला ३३ हजारांवर पोहचले असून स्टॅण्डर्ड सोने ३२ हजारांजवळ आहे. महिनाभरात अमेरिकेतील शेअर बाजारांत मोठी पडझड झाली. या घसरणीत गुंतवणूकदारांनी वर्षभरातील नफा गमावला. शेअरमध्ये धक्के बसलेल्या गुंतवणूकदारांनी कमोडिटी बाजाराकडे मोर्चा वळवला आहे. सोने हे सुरक्षित गुंतवणूक पर्याय असल्याने बड्या केंद्रीय बॅंका, म्युच्युअल फंड कंपन्या, संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सोन्यामधील गुंतवणूक वाढवल्याचे पीएनजी ज्वेलर्सचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी सांगितले. कमोडिटी बाजारात सोने प्रति औंस १२३० ते १२४० डॉलर आहे. 

सोने तेजीने सराफ खूश आहेत; मात्र सोने महाग होत असले, तरी ग्राहकांवर परिणाम होणार नाही, असा विश्‍वास गाडगीळ यांनी व्यक्त केला. 

तेजीतील कारणे...
 शेअर बाजारांमधील पडझड
 खनिज तेलाची महागाई
 अमेरिका-चीन व्यापारी संघर्ष
 सोने गुंतवणुकीकडे वाढता कल
 रुपयाचे अवमूल्यन 
 लग्नसराईचा हंगाम

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold prices have increased in global markets