सोनेविक्रीला मंदीची झळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

धनत्रयोदशीच्या मुहूर्ताला विक्रीत 40 टक्के घसरणीची शक्‍यता 

मुंबई : आर्थिक मंदी आणि महागाईचा फटका शुक्रवारी (ता.25) धनत्रयोदशीनिमित्त होणाऱ्या सोनेखरेदीला बसला. सोनेविक्रीत यंदा 40 टक्के घसरण होईल, अशी भीती सराफांनी व्यक्त केली. महिन्याच्या सुरुवातीला पार पडलेल्या दसऱ्याला सोनेविक्रीत तब्बल 50 टक्‍क्‍यांची घसरण झाली होती. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी नावापुरते सोने खरेदी केले; मात्र दुसऱ्या बाजूला चांदीतील शिक्के आणि इतर वस्तूंच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले. मंदीमुळे सलग दोन मुहूर्तांना विक्री न वाढल्याने सराफा व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा दर प्रतिदहा ग्रॅमला 39 हजारांच्या आसपास; तर चांदीचा भाव 48 हजारांच्या आसपास होता. गतवर्षाच्या तुलनेत या सोनेदरात 15 ते 20 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे; मात्र महागाईपुढे ग्राहकांना खरेदीचा बेत पुढे ढकलावा लागला आहे. मुंबईतील दादर, प्रभादेवी, परळ, झवेरी बाजार येथील प्रमुख सराफा पेढ्यांवर ग्राहकांची लगबग दिसून आली; मात्र विक्रीत फार मोठी वाढ होण्याची शक्‍यता सराफांनी फेटाळली आहे. 

दशकातील सर्वात निराशाजनक धनत्रयोदशी! 
यंदा देशभरात जवळपास सहा हजार किलो सोन्याची विक्री होईल, असा अंदाज "कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स' या संघटनेने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला देशभरात 17 हजार किलो सोन्याची विक्री झाली होती. मागील काही महिनांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. परिणामी शुद्ध सोन्यातील वस्तू आणि दागिन्यांच्या मागणीत 35 ते 40 टक्‍क्‍यांची घसरण होईल, असा अंदाज "कन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'च्या गोल्ड ऍण्ड ज्वेलरी समितीचे प्रमुख पंकज अरोरा यांनी व्यक्त केला. गेल्या 10 वर्षांतील सर्वात निराशाजनक धनत्रयोदशी असल्याचे त्यांनी सांगितले. ऑल इंडिया जेम्स ऍण्ड ज्वेलरी डोमेस्टिक कौंसिलचे प्रमुख अनंत पद्मनाभन यांनी यंदा 20 टक्के विक्री कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला. सोने शुद्धीकरणातील "एमएमटीसी-पीएएमपी'ने सोन्याऐवजी चांदीच्या विक्रीत 10 ते 15 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold recession hit slump