जीएसटीची वसुली १ लाख कोटींवर; आठ महिन्यांत प्रथमच आकडा पार 

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 2 November 2020

ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारची जीएसटी वसुली एक लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचली असून मागील आठ महिन्यांत पहिल्यांदाच जीएसटी वसुलीने हा टप्पा पार केला आहे. 

नवी दिल्ली - लॉकडाउन शिथील झाल्याने व्यवहार पूर्वपदावर येत असल्याचे विविध दावे होत असले तरी त्याची प्रचिती आज प्रथमच आली आहे. ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारची जीएसटी वसुली एक लाख कोटी रुपयांच्या वर पोहोचली असून मागील आठ महिन्यांत पहिल्यांदाच जीएसटी वसुलीने हा टप्पा पार केला आहे. 

लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जीएसटी वसुलीही वाढू लागल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. सप्टेंबरमध्ये ९५,४८० कोटी रुपये जीएसटी वसुली झाली होती. अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये १,०५,१५५ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली. यामध्ये वस्तू आणि सेवांच्या आंतरराज्यीय पुरवठ्यावर केंद्राकडून आकारल्या जाणाऱ्या ‘सीजीएसटी’पोटी १९,१९३ कोटी रुपये, तर राज्यांकडून आकारल्या जाणाऱ्या ‘एसजीएसटी’ वसुलीतून २५,४११ कोटी रुपयांचा समावेश आहे. याखेरीज दोन भिन्न राज्यांमध्ये वस्तू आणि सेवा पुरवठ्यावर आकारल्या जाणाऱ्या ‘आयजीएसटी’तूनही २३,३७५ कोटी रुपये मिळाले असून ८,०११ कोटी रुपये उपकरापोटी सरकारला मिळाले आहेत. दरम्यान, जीएसटी परताव्यासाठी विवरणपत्र सादर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. ३१ ऑक्टोबरपर्यंत जीएसटी ३ बी विवरणपत्रांची संख्या ८० लाखावर पोहोचली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दहा टक्क्यांनी प्रमाण वाढले 
सरकारला मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मिळालेल्या महसूलाच्या तुलनेत यंदाचे प्रमाण दहा टक्क्यांनी अधिक आहे. आर्थिक अडचणीमुळे जीएसटी भरपाईसाठी राज्यांनी केंद्राकडे लावलेला तगादा आणि या अर्थसहाय्यासाठी केंद्राने कर्जउभारणीची केलेली तयारी यापार्श्वभूमीवर जीएसटी वसुली लाखावर पोहोचल्याने सरकारच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. कोरोनामुळे लॉकडाउन लागू केल्यानंतर सरकारचा महसूल घटला होता. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जीएसटी वसुलीत झालेली वाढ (कोटी रुपयांत) 
एप्रिल : ३२,१७१ 
मे : ६५,१५१ 
जून : ९०,९१७ 
जुलै : ८७,४२२ 
ऑगस्ट : ८६,४४९ 
सप्टेंबर : ९५,४८० 
ऑक्टोबर : १,०५,१५५ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: GST collection on Rs 1 lakh crore Over the figure for the first time in eight months

Tags
टॉपिकस
Topic Tags: