जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर रुपयाला आणखी स्थिरता लाभणार

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 जुलै 2017

अमेरिकेमध्ये ट्रम्प यांचे सरकार आल्यानंतर डॉलर निर्देशांकामध्ये 2.1 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. मंदावलेले पतधोरण आणि विक्रीमुळे गुंतवणूकदारांनीही सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळते. अशा स्थितीत ढेपाळलेल्या डॉलरचा फायदा रुपयाला मिळत आहे

नवी दिल्ली - नोटाबंदीचा निर्णय 8 नोव्हेंबर 2016 रोजी झाल्यानंतर रुपयाला बळकटी मिळाल्याचे चित्र आहे. मागील तीन महिन्यांमध्ये रुपयाला स्थिरता मिळाली आहे. आगामी काळात रुपया 63.50 स्तरापर्यंत येण्याची शक्‍यता आहे. वर्षभर रुपयामध्ये स्थिरता राहणार असून, तो 65.5 स्तरावर जाऊ शकणार नाही, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चलनतज्ज्ञांच्या मते सध्याच्या स्थितीतील रुपया आणखी मजबूत होण्याची शक्‍यता आहे. रुपयाला ढेपाळलेला डॉलर निर्देशांक यासह वस्तू व सेवाकराची (जीएसटी) अंमलबजावणी आणि चांगल्या मॉन्सूनचा फायदा होणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर रुपया घसरून 68 रुपयांच्या स्तरावर पोचला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये सर्वाधिक 64 रुपयांपर्यंत घसरण नोंदविण्यात आली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या "अमेरिका फर्स्ट'च्या धोरणामुळे डॉलरमध्ये घसरण झालेली पाहावयास मिळत आहे. विशेषतः या वर्षभरात डॉलर निर्देशांक कमालीचा घसरलेला आहे. याबाबत बोलताना केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया म्हणाले, की अमेरिकेने मागील फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे सांगितले असले, तरी त्यासंबंधीची माहिती दाखवली नाही. जानेवारीमध्ये डॉलर निर्देशांक 100 च्या आसपास होता, तो सध्या 95 टक्‍क्‍यांवर आला आहे.

एंजेल ब्रोकिंगचे अनुज गुप्ता म्हणाले, की अमेरिकेमध्ये ट्रम्प यांचे सरकार आल्यानंतर डॉलर निर्देशांकामध्ये 2.1 टक्‍क्‍यांची घसरण झाली आहे. मंदावलेले पतधोरण आणि विक्रीमुळे गुंतवणूकदारांनीही सावध भूमिका घेतलेली पाहायला मिळते. अशा स्थितीत ढेपाळलेल्या डॉलरचा फायदा रुपयाला मिळत आहे.

जीएसटीमुळे रुपया बहरणार
जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळून परकी गुंतवणूकदार आकर्षित होणार आहेत, याचा थेट फायदा रुपयाला होणार आहे. गुंतवणूकदारांच्या परकी गंगाजळीने रुपया अधिक मजबूत होणार आहे. याचसोबत कर उत्पन्नाच्या आधारे सरकारच्या गंगाजळीत वाढ होणार आहे. यामुळे आर्थिक सुधारणांसाठी सरकार खर्चही वाढवण्याची शक्‍यता आहे. यामुळे विकासदर वेगवान होईल, तर रुपयालाही चालना मिळणार आहे.

रुपया 63 च्या स्तरावर येणार?
विविध चलनतज्ज्ञांच्या मते आगामी काळामध्ये रुपया 63 च्या स्तरापर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे. चालू वर्षामध्ये रुपया 65 ते 63 स्तरांत व्यवहार करण्याची शक्‍यता आहे.

Web Title: GST to strengthen Indian Rupee