एचडीएफसी बॅंकेने तीन वर्षात केले 90 हजार कोटींचे कर्जवाटप 

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

एचडीएफसी बॅंकेचे मध्यम स्वरुपाचे कॉर्पोरेट कर्ज वितरण मागील तीन वर्षात दुपटीने वाढून 90,000 कोटींवर पोचले आहे

मुंबई: एचडीएफसी बॅंकेचे मध्यम स्वरुपाचे कॉर्पोरेट कर्ज वितरण मागील तीन वर्षात दुपटीने वाढून 90,000 कोटींवर पोचले आहे. त्यामुळे एचडीएफसी बॅंक या श्रेणीतील सर्वात मोठी बॅंक ठरली आहे. जर बॅंकेने जूनअखेर नोंदवलेली 21 टक्क्यांची वाढ या तिमाहीतसुद्धा कायम ठेवली तर या महिन्याअखेर एचडीएफसी बॅंक 1 लाख कोटी कर्ज वितरणाचा टप्पा ओलांडण्याची शक्याता आहे. विश्लेषकांच्या मते बॅंक ही घोडदौड अशीच सुरू ठेवण्याची चिन्हे आहेत. ज्या कंपन्या किंवा व्यवसायांची वार्षिक उलाढाल 200 कोटी रुपये ते 1,000 कोटी रुपये इतकी आहे त्यांना मध्यम श्रेणीतील कॉर्पोरेट असे संबोधले जाते. बॅंकेच्या एकूण 4 लाख 7 हजार कोटी रुपयांच्या कर्जात या मध्यम स्वरुपाचे व्यावसायिक कर्ज वितरण सध्या 90,000 कोटी रुपये इतके आहे. जून 2016 अखेर या श्रेणीतील कर्ज वितरण 45,000 कोटी रुपये इतके होते. त्यानंतर मागील तीन वर्षात जून 2019 अखेर ते 90,000 कोटी रुपयांवर पोचले आहे. बॅंकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील एकूण 60 लाख कोटी रुपये कर्ज वितरण व्यवसायात 15 टक्के म्हणजेच 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरण मध्यम स्वरुपाच्या कॉर्पोरेट किंवा व्यावसायिकांना करण्यात आले आहे. यातून या श्रेणीतील कर्ज वितरण व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते. एचडीएफसी बॅंक 49 शहरांत 180 रिलेशनशीप मॅनेजरसह 3,500 कंपन्यांना आपली सेवा पुरवते आहे. तीन वर्षांआधी बॅंकेची उपस्थिती 18 शहरात आणि सध्या असलेल्या ग्राहकांच्या निम्म्याच ग्राहकांपर्यत होती.

'बॅंकिंग व्यवसाय हा आज फक्त पतपुरवठा करण्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही. आम्ही ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांनुरूप सेवा पुरवतो. यात रोकडचे नियोजन, पुरवठादार, परकी चलन यासारख्या असंख्य सुविधांचा समावेश आहे. त्यामुळेच आम्ही या क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकलो आहोत', असे मत एचडीएफसी बॅंकेच्या मध्यम कॉर्पोरेट कर्ज वितरण विभागाचे प्रमुख नीरव शाह यांनी व्यक्त केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: HDFC Bank doubles mid-corporate loan book to over Rs 90000 cr