निकालांमुळे ‘एचडीएफसी बँके’चा शेअर उच्चांकी पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 24 एप्रिल 2017

मुंबई: एचडीएफसी बँकेच्या शेअरने तिमाही निकालांच्या घोषणेनंतर आज(सोमवार) 1538.00 रुपयांवर उच्चांकी पातळी गाठली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात सुमारे 2.50 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

मुंबई: एचडीएफसी बँकेच्या शेअरने तिमाही निकालांच्या घोषणेनंतर आज(सोमवार) 1538.00 रुपयांवर उच्चांकी पातळी गाठली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये इंट्राडे व्यवहारात सुमारे 2.50 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

बॅंकेने गेल्या आठवड्यात शुक्रवारी चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. बँकेच्या निव्वळ नफ्यात 18.3 टक्के वाढ झाली असून बँकेला रु.3990 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. व्याज उत्पन्नातील वाढीमुळे बँकेच्या नफ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, बँकेच्या निव्वळ व्याज उत्पन्नात 21.5 टक्के वाढ झाली आहे. 31 मार्च, 2017 रोजी संपलेल्या तिमाहीत एचडीएफसी बँकेला रु. 9055.1 कोटींचे निव्वळ व्याज उत्पन्न मिळाले आहे.

तिमाही दर तिमाही आधारावर जानेवारी-मार्च तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या ग्रॉस एनपीए 1.05 टक्क्यावर कायम आहे. ग्रॉस एनपीए रु.5232.3 कोटींवरून रु. 5885.6 कोटींवर पोचले आहे. तर नेट एनपीए 0.32 टक्क्यावरून किरकोळ वाढले आहे. ते आता 0.33 टक्के झाले आहे. नेट एनपीए रु.1564.3 कोटी होते. ते आता रु.1844 कोटींवर पोचले आहे.

सध्या(सोमवार, 12 वाजून 2 मिनिटे) एचडीएफसी बँकेचा शेअर 1533.50 रुपयांवर व्यवहार करत असून 2.46 टक्क्यांनी वधारला आहे. दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने  1085.60 रुपयांची नीचांकी तर 1538.00 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. सध्याच्या शेअरच्या भावानुसार, कंपनीचे 392,582 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: HDFC Bank leads the bank stocks; pushes up the BSE Bankex