भांडवली बाजाराची संरचना वेगाने विकसित

आमच्या वडिलोपार्जित व्यवसायात १९६९मध्ये मी सहभागी झालो. मी कामाला सुरवात केली त्या वेळीच आमची ‘डीएसपी’ ही ब्रोकिंग फर्म शंभर वर्षांची होती.
Hemendra Kothari
Hemendra KothariSakal

सुधारणांनंतर भांडवली बाजाराची पायाभूत संरचना वेगाने विकसित झाली आणि २१व्या शतकाला तिचे साजेसे स्वरूप साकारले. भांडवली बाजार व्यवहार आणि सरकारी रोखे व्यापाराबाबत व्यवस्था प्रगत बनली.

आमच्या वडिलोपार्जित व्यवसायात १९६९मध्ये मी सहभागी झालो. मी कामाला सुरवात केली त्या वेळीच आमची ‘डीएसपी’ ही ब्रोकिंग फर्म शंभर वर्षांची होती. त्या वेळी भारत आणि भारताचे धोरणकर्ते समाजवादी विचारांच्या प्रभावाखाली होते. हेच वर्ष बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाचे होते. त्या वेळी मी तरुण होतो, पण माझा कल औद्योगिक रचना उभी करण्याचा होता आणि त्यामुळेच ‘मर्चंट बॅंके’कडे मी उत्तम मनुष्यबळ आकृष्ट करू शकलो.

१९७५ मध्ये ‘डीएसपी फायनान्शिअल कन्सल्टन्सी’ स्थापन केली. तो काळ असा होता, ज्या वेळी भारत भांडवलासाठी तहानलेला होता. परकी वित्तसंस्था आणि बॅंका यांच्याशी संपर्क ठेवून भारतात भांडवली गुंतवणुकीसाठी आम्ही प्रयत्न केले. कर्ज आणि भागभांडवल या दोन्हींच्या बाबतीत आम्ही काम केले. या क्षेत्रातील पायाभूत काम आमच्या कंपनीने केले. तेल व नैसर्गिक वायू महामंडळाचे (ओएनजीसी) युरोबॉँड, स्विस फ्रॅंक बॉँड (आयसीआयसीआय) आणि पहिले जर्मन बॉँड (आयडीबीआय) हे आमच्या कंपनीने पहिल्यांदा आणले. त्या अर्थाने ही कंपनी देशात अनेक क्षेत्रांचा पाया रचणारी ठरली.

जगाचे क्षितिज मोकळे

१९९१ हे वर्ष भारतासाठी आणि अर्थातच आमच्या कंपनीसाठी स्थित्यंतरात्मक बदलांचे ठरले. अनावश्यक नियंत्रणे हटवून अर्थव्यवस्था खुली करताच मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण झाल्या. परकी वित्तसंस्थांना भारताची बाजारपेठ खुली झाल्याने ‘मेरिल लिंच’ या कंपनीबरोबरचा आमचा संबंध हा संयुक्त भागीदारीत परावर्तित झाला. साऱ्या जगाचे क्षितिज आमच्यासाठी मोकळे झाले होते. आमच्या क्षमता प्रचंड प्रमाणात वाढल्या. भारताच्या भांडवली बाजाराची पायाभूत संरचनादेखील वेगाने विकसित झाली आणि २१व्या शतकाला तिचे साजेसे स्वरूप साकारले. भांडवली बाजारातील व्यवहारांबाबत आणि सरकारी रोख्यांच्या व्यापाराबाबत भारतातील व्यवस्था अत्यंत प्रगत बनली आहे.

योगायोगाने १९९०मध्येच जागतिक भांडवलाचाही सर्वव्यापी संचार सुरू झाला होता. भारतातील आर्थिक सुधारणांमुळे या नव्या परिस्थितीचा फायदा भारताला उठवता आला. त्यातून एक सुष्टचक्र सुरू झाले. परदेशातून जास्तीत जास्त भांडवल यायला लागले आणि विकासालाही गती मिळाली. सकल देशांतर्गत उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीत त्यांचे प्रतिबिंब पडले. वित्त क्षेत्रातील सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्याला आता भारतात सुरुवात झाली आहे. बॅंकिंगचा कायापालट होत आहे. दिवाळखोरीविषयक संहिता लागू झाल्याने मनुष्यबळ आणि मालमत्ता नुसती पडून राहण्याच्या समस्येला आळा घातला गेला आहे. जनधन, आधार, ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय) यांमुळे बॅंकिंगचा परीघ चांगलाच विस्तारला आहे. थेट परकी गुंतवणुकीचा ओघ कायम राहावा, यासाठी सातत्याने पावले उचलली गेली. गेल्या वर्षी तर कोरोनाची महामारी असतानाही भारत सर्वाधिक परकी गुंतवणूक आकर्षित करणारा देश ठरला. सरकार उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी पावले उचलत आहे. या गतीने महत्त्वाच्या आर्थिक सुधारणा घडणे हे भारताला महासत्ता बनवेल.

- हेमेंद्र कोठारी, संस्थापक व अध्यक्ष, डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स

(लेखक ‘डीएसपी इन्व्हेस्टमेंट मॅनेजर्स’चे संस्थापक-अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com