महागाईचा भडका

पीटीआय
बुधवार, 13 जून 2018

नवी दिल्ली - फळे, भाजीपाला, धान्ये आणि इंधन दरवाढीने मे महिन्यात किरकोळ चलनवाढीचा दर ४.८७ टक्‍क्‍यांपर्यंत गेला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने मे महिन्याच्या अखेरीस ग्राहकांचे कंबरडे मोडले होते. गेल्या चार महिन्यांतील किरकोळ चलनवाढीचा हा उच्चांकी दर आहे.

केंद्रीय सांख्यिकी विभागाने मंगळवारी चलनवाढीची मे महिन्यातील आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, मे महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित चलनवाढीचा दर ४.८७ टक्‍क्‍यांवर गेला आहे. एप्रिल महिन्यात तो ४.५८ टक्के होता. गेल्या महिन्यात भाजीपाल्याच्या भावात ८ टक्के वाढ झाली. किरकोळ बाजारात आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर वाढले होते. फळे १२.३३ टक्के आणि तृणधान्ये आणि त्यासंबंधित उत्पादने २.७८ टक्के महागली. इंधन आणि ऊर्जेतील चलनवाढ मे महिन्यात ५.८ टक्‍क्‍यांवर गेली आहे. मांस, मटण, मासे, तसेच अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांच्या किमतींमध्ये काही प्रमाणात घसरण नोंदवण्यात आली. 

कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात सलग १९ दिवस पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नव्हती. निवडणूक झाल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दोन आठवडे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले होते. चलनवाढीचा आलेख मागील काही महिन्यांत चढता असल्याने व्याजदरात वाढ करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेवर दबाव आला होता. त्यामुळे महागाई नियंत्रणाला प्राधान्य देत रिझर्व्ह बॅंकेने या महिन्यात पतधोरणात व्याजदरात ०.२५ टक्का वाढ केली. 

Web Title: high rate of retail inflation