esakal | अधिक परतावा हवा असेल, तर...
sakal

बोलून बातमी शोधा

अधिक परतावा हवा असेल, तर...

रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो.

अधिक परतावा हवा असेल, तर...

sakal_logo
By
अरविंद परांजपे

रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे परतावाही अधिक, हे सूत्र गृहीत धरलेले असतेच.
शेअर बाजारात सुमारे पाच हजार कंपन्यांची नोंद झालेली आहे. गुंतवणूकदारांना निवड करायला सोपे जावे म्हणून गेल्या वर्षी "सेबी'ने म्युच्युअल फंड योजनांची प्रमाणित वर्गवारी केली. त्यातील इक्विटी योजनांचे त्यांच्या "मार्केट कॅपिटलायझेशन'नुसार वेगवेगळे प्रकार आहेत. (मार्केट कॅपिटलायझेशन = नोंद झालेल्या शेअरची संख्या गुणिले प्रति शेअर बाजारभाव).
लार्ज कॅप योजना ः 1 ते 100 कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन 28 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त), मिड कॅप योजना ः 101 ते 251 कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन 8500 कोटी ते 28 हजार कोटी रुपये), स्मॉल कॅप योजना ः 251 च्या नंतच्या सर्व कंपन्या (मार्केट कॅपिटलायझेशन 8500 कोटी रुपयांपेक्षा कमी) असे ते प्रकार आहेत.


जेवढी कंपनी मोठी, तेवढे त्याचे मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आणि तुलनेने त्यातील जोखीम कमी. मोठ्या कंपन्या त्यांच्या क्षेत्रात दिग्गज असतात, त्यांच्या शेअरची संख्याही जास्त असते. बाजारातील चढ-उतार मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांपेक्षा कमी असल्याने त्यांत जोखीम कमी असते. त्यात "मल्टीबॅगर' म्हणजे कमी काळात शेअरचे भाव काही पट वाढण्याची शक्‍यता नसते. त्यामुळे आपली गुंतवणूक वेगाने वाढवू शकणाऱ्या स्मॉल कॅप योजनांची गरज भासते. अशा स्मॉल कॅप म्हणजे लहान कंपन्यांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असतात-
1) त्यांना त्यांचा व्यवसाय काही पटीने वाढविण्याची संधी असते. कंपनीचे मालक हे जास्त हिरिरीने व्यवसाय करीत असतात.
2) मोठ्या कंपन्या ज्या क्षेत्रात कमी प्रमाणात असतात, (उदा. रसायने, पॅकेजिंग, बांधकामपूरक व्यवसाय अशी क्षेत्रे) अशा व्यवसायांमध्ये लहान कंपन्या अधिक चांगली कामगिरी करू शकतात.
3) या कंपन्यांची कमी माहिती उपलब्ध असते आणि त्यांचे विश्‍लेषण कमी होते. म्युच्युअल फंड मॅनेजर हे यातील चांगल्या कंपन्यांचा शोध घेऊन त्यात गुंतवणूक करतात. मात्र असे करताना निवड करण्याच्या सर्व चाळण्या (भक्कम ताळेबंद, कमी कर्ज, आश्‍वासक वाढीची गती आदी) लावूनच निवड केली जाते. शिवाय या कंपन्यांच्या व्यवस्थापनाबरोबर नियमित भेटी घेऊन प्रवर्तकांच्या विश्‍वासार्हतेची खात्री केली जाते.
सोबतच्या तक्‍त्यावरून विविध प्रकारांच्या परताव्यांमध्ये किती तफावत असते, याचा अंदाज येऊ शकतो. कमी कालावधीत स्मॉल कॅप योजना झटका देऊ शकतात, हे पण यात अधोरेखित होते.

----------------------------------------------------------
योजना प्रकार  1 वर्ष  3 वर्षे  5 वर्षे
----------------------------------------------------------
लार्ज कॅप  4 टक्के  12.8 टक्के  13.9 टक्के
मल्टी कॅप  0.9 टक्के  12.6 टक्के  14.3 टक्के
मिड कॅप  - 7.1 टक्के  12.2 टक्के  17.7 टक्के
स्मॉल कॅप  - 14.2 टक्के  12.1 टक्के  19 टक्के
फोकस्ड योजना 2.9 टक्के 14.1 टक्के 15 टक्के
निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्‍स - 20 टक्के 8.20 टक्के 10.5 टक्के
निफ्टी     50 10 टक्के     14 टक्के      11.4 टक्के

(टीप ः ही आकडेवारी 25 एप्रिल 2019 पर्यंतची आहे. भविष्यात अशीच कामगिरी होईल, याची खात्री देता येत नाही.)

फोकस्ड योजना ः
""विविधता चांगली असते, त्याने तुमच्या संपत्तीचे रक्षण होते, पण संपत्ती वाढविण्यासाठी केंद्रीकरण जरुरीचे असते.'' - वॉरन बफे
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे विविधतेमुळे जोखीम कमी होते. कारण सर्वसामान्य इक्विटी योजनेमध्ये साधारणपणे 40 ते 60 कंपन्यांचा समावेश असतो. पण या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे एकूण परतावाही कमी होतो. त्यामुळे ज्यांना अधिक परतावा हवा असेल, त्यांच्यासाठी थोडी अधिक जोखीम घेऊन 30 पेक्षा कमी कंपन्यांचा समावेश असलेल्या फोकस्ड योजनांचा विचार करता येईल. गेल्या पाच वर्षांमध्ये निफ्टी 100 निर्देशांकाने एकूण 90 टक्के परतावा दिला, पण त्यातील उच्च परतावा देणाऱ्या 30 कंपन्यांनी एकूण 220 टक्के परतावा दिला आहे. ही मल्टी कॅप योजना कोणत्याही क्षेत्रातील कोणत्याही आकाराच्या कंपनीची निवड करते. फंड मॅनेजरच्या मते खात्रीलायक, आकर्षक परतावा देणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाते.


नव्या योजना बाजारात ः
सध्या प्रिन्सिपल स्मॉल कॅप फंड आणि मिरे फोकस्ड फंड या नव्या योजनांची (एनएफओ) विक्री चालू आहे. या दोन्ही फंड कंपन्यांच्या अन्य योजनांची कामगिरी समाधानकारक असल्याने, या दोन्ही नव्या योजना असल्या तरीही त्यांचा विचार करायला हरकत नाही. या दोन्ही खुल्या प्रकारातील योजना असून, नंतर कधीही यात खरेदी करता येणार आहे. येत्या 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकालांचा शेअर बाजारावर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेऊन या योजनांचे फंड मॅनेजर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणार आहेत. ज्यांना अधिक परताव्याची अपेक्षा आहे आणि दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची इच्छा आहे, त्यांनी या दोन किंवा या प्रकारातील अन्य योजनांचाही विचार करावा.


निवृत्तीनंतरची किंवा मुलांच्या शिक्षणाची तरतूद (15-20 वर्षे मुदतीसाठी) करण्यासाठी स्मॉल कॅप योजनांचा समावेश योग्य ठरतो. अर्थात जसे सर्वांच्याच पोटाला मिरची चालतेच, असे नाही, तसे सर्वांनीच स्मॉल कॅप योजनेत गुंतवणूक करावी, असे नाही. गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अन्य घटक (आटोक्‍यातील महागाई दरवाढ, स्थिर रुपया, कमी होऊ शकणारे व्याजदर, सुमारे 7 टक्के विकास दर आदी) अनुकूल असल्याने आपले "ऍसेट ऍलोकेशन' लक्षात घेऊन नेहमीच्या इक्विटी, डेट आणि बॅलन्स्ड योजनांत गुंतवणुकीचा ("एसआयपी'/ "एसटीपी'च्या मार्गाने) विचार करायला हवा.


(डिस्क्‍लेमर ः म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधिन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी योजनेशी संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.)