फसवणुकीत ICICI, SBI बँका आघाडीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 13 मार्च 2017

आरबीआयने नुकतीच एप्रिल- डिसेंबर 2016 या नऊ महिन्यांच्या काळात बॅंकेत घडलेल्या विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत यादी सादर केली आहे. त्यानुसार आयसीआयसीआय बँकेमध्ये एक लाख रुपयांहून अधिक रक्कमेचे 455 फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत.

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) अर्थ मंत्रालयाला नुकतीच बँकांमध्ये होणार्‍या फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत एक यादी सादर केली आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बॅंक सर्वात आघाडीवर आहे. तर, त्यापाठोपाठ देशातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेचा (एसबीआय) क्रमांक आहे.

आरबीआयने नुकतीच एप्रिल- डिसेंबर 2016 या नऊ महिन्यांच्या काळात बॅंकेत घडलेल्या विविध फसवणुकीच्या गुन्ह्यांबाबत यादी सादर केली आहे. त्यानुसार आयसीआयसीआय बँकेमध्ये एक लाख रुपयांहून अधिक रक्कमेचे 455 फसवणुकीची प्रकरणे घडली आहेत. तर एसबीआयमध्ये 429 फसवणुकीच्या घटना घडल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यापाठोपाठ स्टॅण्डर्ड चार्टर्ड  बँक 244, एचडीएफसी बँक 237, अॅक्सिस बँक 189, बँक ऑफ बडोदा 176, आणि सिटी बँकेत 150 फसवणुकीची प्रकरणे बाहेर आली आहेत.

फसवणुकीची रुपयांमध्ये तुलना करावयाचे झाल्यास एसबीआयमध्ये 2,236. 81 कोटींची, पंजाब नॅशनल बँकेत 2250.34 कोटी आणि अॅक्सिस बँकेत 1,998.49 कोटींचे फसवणुकीचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. आरबीआयने केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे सादर केलेल्या यादीनुसार, फसवणुकीच्या काही गुन्ह्यांमध्ये बँकांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फसवणुकीच्या या घटनांमध्ये सर्वाधिक एसबीआयचे 64 कर्मचारी आहेत, एचडीएफसी बॅंकेचे 49 तर अॅक्सिस बँकेचे 35 कर्मचारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील विविध बँकांमधील सुमारे 450 बँक कर्मचारी यात सामील आहेत.

दिलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल- डिसेंबर 2016 या नऊ महिन्यांच्या काळात 17,750.27 कोटींची एकूण 3870 फसवणुकीची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

(अर्थ विषयक अधिक घडामोडींच्या माहितीसाठी क्लिक करा)

Web Title: ICICI Bank, SBI top bank frauds list: RBI