रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्यांना बंगळूरमध्ये अटक

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

या दोन अधिकाऱ्यांनी अन्य काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बंद नोटा बेकायदा बदलून दिल्या. एकूण 1.99 कोटी रुपयांच्या बंद नोटा घेऊन त्याऐवजी दोन हजार व शंभरच्या नोटा बदलून दिल्या.

नवी दिल्ली - पाचशे व हजाराच्या बंद झालेल्या 1.92 कोटी रुपयांच्या नोटा बदलून देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या दोन अधिकाऱ्यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बंगळूरमध्ये अटक केली.

सीबीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बॅंकेचे वरिष्ठ विशेष सहायक सदानंद नाईक आणि विशेष सहायक ए. के. अवीन या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर बेकायदा नोटा बदलून दिल्याप्रकरणी गुन्हेगारी कट आखणे आणि फसवणुकीसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांची रवानगी बंगळूरमधील विशेष न्यायालयाने चार दिवसांसाठी सीबीआय कोठडीत केली आहे.

या दोन अधिकाऱ्यांनी अन्य काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बंद नोटा बेकायदा बदलून दिल्या. एकूण 1.99 कोटी रुपयांच्या बंद नोटा घेऊन त्याऐवजी दोन हजार व शंभरच्या नोटा बदलून दिल्या. याआधी सीबीआयने स्टेट बॅंक ऑफ म्हैसूरमधून सहा लाख रुपये बदलून देणाऱ्या रिझर्व्ह बॅंकेच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे.

Web Title: Illegal exchange of old notes: CBI arrests 2 RBI officials in Bengaluru