ट्रम्प अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी अल्पकाळच चांगले

वृत्तसंस्था
रविवार, 12 फेब्रुवारी 2017

ट्रम्प यांची अमेरिकेत पायाभूत सुविधांमध्ये अतिरिक्त गुंतवणूक करण्याची योजना आहे. तसेच, त्यांच्या कर सुधारणांच्या पावलामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे.

दुबई - अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेसाठी अल्पकाळ चांगले वातावरण निर्माण होणार आहे.

मात्र, त्यानंतर डॉलरचा वाढता भाव आण व्याजदरातील वाढ यामुळे जागतिक व्यापार आव्हानात्मक होणार आहे, असे मत आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) अध्यक्षा ख्रिस्तिन लगार्ड यांनी रविवारी व्यक्त केले.

ख्रिस्तिन लगार्ड म्हणाल्या, "ट्रम्प यांची अमेरिकेत पायाभूत सुविधांमध्ये अतिरिक्त गुंतवणूक करण्याची योजना आहे. तसेच, त्यांच्या कर सुधारणांच्या पावलामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. यामुळे काही प्रमाणात अमेरिकेच्या विकासाबाबत आशादायी वातावरण आहे.''

ट्रम्प यांच्या धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसमोर अडचणी निर्माण होतील, असे लगार्ड यांनी नमूद केले. अमेरिका आणि जगात अन्यत्र संरक्षणात्मक वातावरण वाढू लागले असल्याच्या पार्श्‍वभूमीवर जागतिकीकरण आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचे समर्थन लगार्ड यांनी केले. लगार्ड या दुबईतील जागतिक सरकार परिषदेत बोलत होत्या.

Web Title: IMF head: Trump good for US economy for now as trouble looms