भारताने ४०० अब्ज अमेरिकी डॉलरची केली निर्यात

आर्थिक वर्षात कोविडच्या सावटाखालीही भारताने ४०० अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याच्या विक्रमी निर्यातीचे लक्ष्य गाठल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहीर केले.
Narendra Modi
Narendra ModiSakal
Summary

आर्थिक वर्षात कोविडच्या सावटाखालीही भारताने ४०० अब्ज अमेरिकी डॉलर मूल्याच्या विक्रमी निर्यातीचे लक्ष्य गाठल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी जाहीर केले.

नवी दिल्ली - या आर्थिक वर्षात कोविडच्या (Covid) सावटाखालीही भारताने (India) ४०० अब्ज अमेरिकी डॉलर (American Dollar) मूल्याच्या विक्रमी निर्यातीचे लक्ष्य गाठल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बुधवारी जाहीर केले. आत्मनिर्भर भारत योजनेमुळे आपण हे लक्ष्य गाठले असून हे आपले मोठे यश असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

आपली ही आतापर्यंतची सर्वात जास्त निर्यात असून ३१ मार्चच्या ठरवलेल्या तारखेच्या नऊ दिवस आधीच हे लक्ष्य साधले गेले याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. मागील आर्थिक वर्षात ही निर्यात २९२ अब्ज डॉलर एवढी होती, या वर्षी त्यात ३७ टक्के वाढ झाली आहे. या यशाबद्दल शेतकरी, उद्योजक, उत्पादक व निर्यातदार आदींचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.

मोदी यांनी यासंदर्भात ट्विट करून वरील माहिती दिली आहे. हे ध्येय गाठण्यासाठी सरकारने राज्य सरकारांशी अगदी जिल्हा पातळीपर्यंत सुसंवाद ठेवला, निर्यातदारांच्या समस्या जाणून त्या त्वरेने सोडविण्यावर भर दिला, निर्यातीस प्रोत्साहन देणाऱ्या उद्योग संघटनांबरोबरही संपर्क ठेवला व त्याचमुळे हे उद्दिष्ट गाठले गेले. वर्षभर सरासरी रोज एक अब्ज डॉलर मूल्याची व दरमहा ३३ अब्ज डॉलरची निर्यात झाल्याचे ते यात म्हणाले.

गाठलेले लक्ष्य उल्लेखनीय

पेट्रोलियम उत्पादने, इंजिनिअरिंग साहित्य, चामड्याच्या वस्तू, कॉफी, प्लास्टिक, तयार कपडे, मांस, मासे व दुग्धजन्य पदार्थ, तंबाखू याची प्रामुख्याने निर्यात झाली. या वर्षातही कोविडमुळे वाहतुकीवर आलेल्या मर्यादा, कंटेनरचा तुटवडा, वाहतुकीच्या दरात झालेली प्रचंड वाढ व खेळत्या भांडवलाची कमतरता या सर्वांवर मात करून आपण गाठलेले लक्ष्य उल्लेखनीय आहे, असे फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनचे महासंचालक अजय सहाय म्हणाले.

पुन्हा बंदिस्त अर्थव्यवस्थेकडे नाही - राजीव कुमार

नवी दिल्ली - आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे आपली अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीसारखी बंदिस्त होणार नाही, असे मत निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केले. उलट जागतिक पुरवठा साखळीत भागीदार झाल्याने भारतीय नागरिकांना अच्छे दिन येतील, यावरही त्यांनी भर दिला.

उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेनुसार जपानी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करताना त्यांनी हे मत व्यक्त केले. जागतिक तंत्रज्ञान आणि अर्थपुरवठा, तसेच भारतीय यंत्रणा यांचा मिलाप झाल्यास भारताला फायदा आहे, असेही ते यासंदर्भातील एका परिसंवादात म्हणाले. जपानी कंपन्यांनी भारतात प्रकल्प उभारून भारताला निर्यातीचे केंद्र बनवावे, अशी आमची इच्छा आहे. भारतात त्याची पायाभरणी झाली असल्याने जपानी गुंतवणूक येथे यावी यासाठी आम्ही सर्वकाही करू, अशी ग्वाहीदेखील कुमार यांनी दिली. पूर्वीच्या बंदिस्त भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेत परदेशी कंपन्या-भांडवल यांना फारसा प्रवेश नव्हता. मात्र, नरसिंह राव यांनी खुलेपणाचे धोरण स्वीकारल्यावर बंदिस्त भारतीय अर्थव्यवस्था खुली झाली, असेही ते यावेळी म्हणाले.

अनेक क्षेत्रे खुली

पंतप्रधानांची आत्मनिर्भर भारत योजना किंवा उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजना यामुळे भारत पूर्वीच्या (परदेशी उद्योगांसाठी) बंद अर्थव्यवस्थेकडे जाणार नाही. आता आपण जागतिक व्यापार आणि अर्थव्यवस्थांशी जुळवून घेतले असून त्यापासून आपण मागे हटणार नाही, अशीही खात्री त्यांनी व्यक्त केली. उलट आता आपण संरक्षण आदी अनेक क्षेत्रे परदेशी गुंतवणूकदारांसाठी खुली करत असल्याचेही त्यांनी दाखवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com